Home सामाजिक श्रीरामभक्तांसाठी आनंदाची बातमी

श्रीरामभक्तांसाठी आनंदाची बातमी

12

बल्लारशा-अयोध्या रेल्वे सेवेला हिरवा कंदील !

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला रेल्वेमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

ताडोबा, विदर्भ आणि उत्तर भारत रेल्वेने जोडला जाणार

श्रीराम मंदिराशी चंद्रपूरचा भावनिक संबंध अधोरेखित

चंद्रपूर : राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश आले असून, बल्लारशा जंक्शन ते अयोध्या दरम्यान नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याच्या मागणीला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दिल्ली येथे झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत रेल्वेमंत्र्यांनी या प्रस्तावावर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

चंद्रपूरचा अयोध्येशी भावनिक बंध
या बैठकीत बोलताना आ. मुनगंटीवार यांनी प्रभू श्रीराम मंदिराशी चंद्रपूर जिल्ह्याचा असलेला ऐतिहासिक आणि भावनिक संबंध अधोरेखित केला. अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या गर्भगृहासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील ‘काष्ठ’ (सागवान लाकूड) पाठवण्यात आले होते. यामुळे या परिसरातील प्रत्येक नागरिकाचे अयोध्येशी विशेष नाते निर्माण झाले आहे. ही रेल्वे सेवा सुरू झाल्यास या भागातील हजारो रामभक्तांचे अयोध्येला जाण्याचे स्वप्न सुलभ होणार आहे.

असा असेल संभाव्य मार्ग
प्रस्तावित रेल्वे सेवा बल्लारशा – नागपूर – जबलपूर – प्रयागराज मार्गे अयोध्या अशी नियमित स्वरूपात सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. हा मार्ग झाल्यास केवळ अयोध्याच नव्हे, तर प्रयागराज सारख्या तीर्थक्षेत्रालाही विदर्भ थेट जोडला जाईल. यामुळे धार्मिक पर्यटनासोबतच उत्तर भारतीय नागरिकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होईल.

महत्त्वपूर्ण उपस्थिती
दिल्लीतील या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, मध्य रेल्वेच्या ZRUCC चे सदस्य अजय दुबे आणि रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आ. मुनगंटीवार यांच्या या आग्रही मागणीची दखल घेत रेल्वेमंत्र्यांनी या विषयाला गती देण्याचे आश्वासन दिले आहे.

विदर्भाच्या रेल्वे विकासाला नवी दिशा
या नवीन रेल्वे सेवेमुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्या उत्तर भारतातील पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि उत्तर भारतातील धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक संबंध अधिक दृढ होण्याच्या दृष्टीने हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या निर्णयामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी सुधारणा होणार असून प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

error: Content is protected !!