आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला निर्धार
मुल येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी
‘आरोग्य माझा अधिकार’ अभियानाद्वारे तळागाळातील नागरिकांना मिळणार दर्जेदार उपचार
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पीएचसीला केंद्रीय समितीकडून राष्ट्रीय मानांकन
केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांकडून आरोग्य व्यवस्थेचे कौतुक
डॉक्टरांची उपस्थिती, डायलिसिस, सिटीस्कॅन, रक्त तपासणी आणि कॅन्सर उपचारावर विशेष भर
चंद्रपूर : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे जाळे निर्माण करणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. ‘आरोग्य हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. प्रत्येक नागरिकाला वेळेवर, गुणवत्तापूर्ण आणि सन्मानाने आरोग्य सेवा मिळाली पाहिजे,’ हा आपला संकल्प असल्याचेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
. बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित ‘आरोग्य जनसंवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महामंत्री मंगेश गुलवाडे, कामगार नेते अजय दुबे, शहर अध्यक्ष रणांजय सिंह, काशी सिंग, निलेश खरबडे, रेणुका दुधे, जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, मुख्यधिकारी नगर परिषद मुल विशाल वाघ, महेंद्र ढोके, लखनसिंग चंदेल, वैद्यकीय अधीक्षक गजानन मेश्राम, तालुका आरोग्य अधिकारी आशा साळवे आदिंची उपस्थिती होती.
. आरोग्य क्षेत्रातील विविध समस्या, सूचना आणि भविष्यातील नियोजन यावर नागरिक, पदाधिकारी, डॉक्टर व प्रशासन यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आ. मुनगंटीवार यांनी आरोग्य विषयक सर्व सूचना एकत्र करून त्यावर टप्प्याटप्प्याने निर्णय घेतले जाणार असल्याचे सांगितले. ‘आपल्या मतदारसंघात आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. अनेक नवीन दवाखान्यांची कामे सुरू असून संपूर्ण राज्यात आपल्या मतदारसंघाच्या आरोग्य व्यवस्थेची दखल घेतली जात आहे,’ असे त्यांनी सांगितले.
. टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या स्थापनेचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, ‘मुंबई मंत्रालयात असताना धुळे जिल्ह्यातील काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील दोन रुग्णांना उपचारासाठी चंद्रपूरला पाठविल्याचे सांगितले. त्या क्षणी जाणवलं की आपण उभारलेल्या सुविधांवर लोकांचा विश्वास वाढत आहे आणि आता यापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा वाढवण्याची गरज आहे.’
. जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाही. पण आयुष्य निरोगी ठेवणे आपल्या हातात आहे. त्यामुळे आरोग्य सेवेला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. मी एकटा हे बदल घडवू शकत नाही; यासाठी सर्वांची साथ आवश्यक आहे, असे आवाहनही आ. मुनगंटीवार यांनी केले.
मुल येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या उपजिल्हा रुग्णालयाची उभारणी
‘मुल येथे उभारण्यात येत असलेले ग्रामीण रुग्णालय हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या उपजिल्हा रुग्णालयांपैकी एक ठरणार आहे. साधारणतः उपजिल्हा रुग्णालये ८० हजार स्क्वेअर फुटांत उभारली जातात; मात्र मुल येथील रुग्णालय तब्बल १५ हजार स्क्वेअर मीटर म्हणजेच सुमारे १ लाख ५० हजार स्क्वेअर फुट क्षेत्रात विकसित होत आहे. भविष्यात लोकसंख्येच्या वाढीचा विचार करता राज्यातील नवीन रुग्णालये मुलच्या धर्तीवर उभारली गेली पाहिजेत,’ अशा सूचना आपण आरोग्य विभागाला दिल्याचे आ. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयासाठी विशेष निर्णय
बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयाचा संदर्भ देताना आ. मुनगंटीवार म्हणाले, ‘शासनाच्या निकषांनुसार पाच एकर जागेची अट होती; मात्र जागेअभावी अडीच एकरमध्ये मल्टी-स्टोरेज पद्धतीने रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. उमरी पोतदार येथे रुग्णालयाची उभारणी करण्यात आली असून कळमना व मानोरा येथेही अत्याधुनिक प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारण्यात आली आहेत.अभिमानाची बाब म्हणजे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील दुर्गापूर , कळमना, राजोली प्राथमिक आरोग्य केंद्राला एनक्यूएएस केंद्रीय संस्थेद्वारा राष्ट्रीय मानांकन मिळाले आहे.’
मेडिकल कॉलेज, डेंटल कॉलेज आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात कामगार कुटुंबियांसाठी १०० खाटांचे कामगार विमा रुग्णालय सुरू करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. ‘देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या हस्ते उद्घाटन करण्याची इच्छा आहे. या मेडिकल कॉलेजमध्ये अत्याधुनिक एमआरआय मशीन बसवण्यात येणार असून शिर्डी संस्थानच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे. तसेच, पुढील दोन वर्षांत चंद्रपूरमध्ये डेंटल कॉलेज सुरू करण्याचाही मानस आहे. मुख कर्करोगाच्या वाढत्या घटनांमुळे ही गरज निर्माण झाली आहे.’
२०० कोटींच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची तयारी
बल्लारपूर परिसरात सुमारे पाच एकर जागेवर २०० कोटी रुपयांचे अत्याधुनिक हॉस्पिटल उभारण्याचे नियोजन सुरू असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. काही प्रशासकीय अडचणी दूर करून लवकरच या प्रकल्पाला गती मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डायलिसिस, सिटीस्कॅन, सोनोग्राफी आणि रक्त तपासणी सुविधांवर भर
आरोग्य सेवांमध्ये सिटीस्कॅन, सोनोग्राफी, एक्स-रे, डायलिसिस, एअर कंडिशनिंग यांसारख्या सुविधा वाढवण्याचे काम सुरू असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. डॉक्टरांची वेळेवर उपस्थिती, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि स्टाफ वाढवणे यावर विशेष भर देण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर सकाळी नऊ वाजता उपस्थित राहिले पाहिजेत. काही स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध नसतील तर कंत्राटी पद्धतीवर नियुक्त्या करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कॅन्सर, पाण्याची गुणवत्ता आणि श्वसनाच्या आजारांविरोधात विशेष मोहीम
भविष्यात कॅन्सर, डायलिसिसची गरज, दूषित पाणी आणि श्वसनाचे आजार ही मोठी आव्हाने असतील, असे सांगत त्यांनी विशेष आरोग्य मोहीम राबविण्याची गरज व्यक्त केली. रक्तदान हे महादान आहे; पण रुग्णाला शुद्ध आणि सुरक्षित रक्त मिळाले पाहिजे. यासाठी अत्याधुनिक टेस्ट लॅब उभारली जाणार आहे, असेही आ. मुनगंटीवार यांनी जाहीर केले. तंबाखू आणि खर्रा यांसारख्या व्यसनांपासून सर्वांनी दूर राहावे, असे आवाहन करत मुख कर्करोगाच्या वाढत्या घटनांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
कोरोना काळातील व्यवस्थापनाचा उल्लेख
कोरोना काळात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून प्रभावी व्यवस्थापन करण्यात आले होते. भविष्यातही आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
अपघात नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात अपघातांमध्ये काही नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल आ. मुनगंटीवार यांनी दुःख व्यक्त केले. नव्याने रुजू झालेल्या पोलीस अधिक्षकांकडे भाजपाच्या शिष्टमंडळाने अपघात नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना सुचविल्या आहेत. एखाद्या कुटुंबातील व्यक्ती अपघातात गेल्यानंतर त्या कुटुंबावर कोसळणारे दुःख अत्यंत वेदनादायी असते. त्यामुळे या अपघात नियंत्रणाची नितांत गरज असल्याचे ते म्हणाले.
‘आरोग्य माझा अधिकार’ अभियान राबविणार
सरकारच्या विविध आरोग्य योजनांची माहिती अनेकांना नसल्यामुळे गरीब कुटुंब उपचारांपासून वंचित राहतात. त्यामुळे कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत योजना पोहोचविणे आवश्यक असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी म्हटले. फुटपाथवरील व्यावसायिकांसाठी पाच लिटर पाण्याच्या कॅनचे वितरण, उन्हाळ्यात उष्माघातापासून संरक्षणासाठी शेड व छत्र्यांचे वितरण यांसारखे उपक्रम राबविले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
महत्त्वाचे निर्णय व पुढील नियोजन
बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयाची आढावा समिती नियुक्त करणे, प्रमुख पदाधिकाऱ्यांची स्वतंत्र आढावा समिती तयार करणे. स्पेशालिस्ट डॉक्टरांची पदे भरणार किंवा कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या करणे, नर्सिंग व इतर स्टाफ वाढवण्यावर विशेष भर देणे, १५ तारखेनंतर चंद्रपूर नियोजन भवन येथे आरोग्यविभागासंदर्भातील पहिली व्यापक बैठक घेणे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत मुल डायलिसिस सेंटरचे उद्घाटन प्रस्तावित, मुल, पोंभूर्णा,बल्लारपूर आणि चंद्रपूर सामान्य रुग्णालयांचा स्वतंत्र आढावा बैठका आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेणे, असे महत्त्वाचे निर्णय व पुढील नियोजन आहे.


