Home सामाजिक वायगावच्या सुचिता शेंडे यांनी जपली माणुसकी

वायगावच्या सुचिता शेंडे यांनी जपली माणुसकी

3

सापडलेला मोबाईल आणि रोख रक्कम मूळ मालकाला केली परत

प्रवासात हरवलेला मोबाईल प्रामाणिकपणे परत करत सादर केला आदर्श

सुचिता शेंडे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

भद्रावती : तालुक्यातील कोकेवाडा (मा) येथील रहिवासी पंकज गणपत मानकर यांचा हरवलेला मोबाईल आणि त्यातील रोख रक्कम वायगाव (तु) येथील सुचिता एकनाथ शेंडे यांनी प्रामाणिकपणे परत करून माणुसकीचा ओलावा जपला आहे. त्यांच्या या निस्वार्थी कार्याचे परिसरात मोठे कौतुक होत आहे.

.       मिळालेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी दुपारी पंकज मानकर हे कोकेवाडा येथून चंदनखेडा येथील ‘आशिष इलेक्ट्रिकल्स’ येथे कामासाठी जात होते. प्रवासादरम्यान त्यांचा मोबाईल आणि कव्हरमध्ये असलेले ५०० रुपये रस्त्यात कुठेतरी पडले. पेट्रोल पंपवर पोहोचल्यावर मोबाईल जवळ नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी घरी आणि रस्त्याने दोन-तीनदा शोध घेतला, मात्र मोबाईल सापडला नाही.

.        अखेर त्यांनी आशिष इलेक्ट्रिकल्सचे संचालक आशिष हनवते यांना घडलेला प्रकार सांगितला. हनवते यांनी तात्काळ त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता, वायगाव (तु) येथील सुचिता एकनाथ शेंडे यांनी फोन उचलला. त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे सांगितले की, “आम्हाला हा फोन रस्त्यावर पडलेला सापडला आहे. सध्या आम्ही चंद्रपूरला एका लग्न समारंभासाठी जात आहोत, परत आल्यावर तुम्ही तुमचा फोन घेऊन जा.”

.      दिलेल्या शब्दाप्रमाणे, सुचिता शेंडे यांनी लग्नकार्यावरून परत आल्यावर स्वतः संपर्क साधून पंकज मानकर यांना बोलावून घेतले. त्यांनी मोबाईल फोनसह कव्हरमध्ये असलेले ५०० रुपयेही सुरक्षितपणे परत केले. आजच्या काळात जिथे हरवलेली वस्तू मिळणे कठीण असते, तिथे सुचिता शेंडे यांनी दाखवलेला हा मनाचा मोठेपणा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. यावेळी पंकज मानकर, सुचिता शेंडे, गणेश नन्नावरे, सामाजिक कार्यकर्ते शंकर दडमल आणि आशिष हनवते उपस्थित होते.

error: Content is protected !!