जयपूरच्या ‘वृक्ष मित्र सन्मान समारोह २०२६‘सोहळ्यात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन यांची विशेष उपस्थिती
‘श्री कल्पतरू संस्थान’च्या वतीने ५ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प
चंद्रपूर : पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि हरित भारताच्या संकल्पनेला नवी दिशा देणारा एक भव्य सोहळा राजस्थानची राजधानी जयपूर येथे संपन्न होत आहे. महाराष्ट्राचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि त्यांच्याच शुभहस्ते प्रतिष्ठित ‘वृक्ष मित्र सन्मान समारोह २०२६’ मधील पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
पर्यावरण आणि संस्कृतीचा संगम
श्री कल्पतरू संस्थान, जयपूर यांच्या वतीने दि. ६ मे २०२६ रोजी जयपूर येथील हॉटेल क्लार्क्स अमेर येथे हा दिमाखदार सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमात पर्यावरण, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आणि पर्यावरण प्रेमी रविना टंडन यांची उपस्थिती. त्या या व्यासपीठावरून हरित भारताच्या संकल्पनेला पाठिंबा दर्शविणार आहेत.
मुनगंटीवारांच्या ५० कोटी वृक्षलागवडीची दखल
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्राचे वनमंत्री असताना ‘५० कोटी वृक्षलागवड’ ही ऐतिहासिक मोहीम यशस्वीपणे राबवली होती. त्यांनी वनसंवर्धन आणि पर्यावरणपूरक उपक्रमांतून राज्यात केलेली क्रांती संपूर्ण देशासाठी आदर्श ठरली आहे. याच कार्याची दखल घेऊन त्यांना या राष्ट्रीय स्तरावरील सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, राजस्थानमधील हा सोहळा पर्यावरण संवर्धनाच्या राष्ट्रीय चळवळीला अधिक बळ देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
‘श्री कल्पतरू संस्थान’चा वैश्विक प्रवास
गेल्या ३१ वर्षांपासून पर्यावरण रक्षणाचे कार्य करणाऱ्या ‘श्री कल्पतरू संस्थान’ने आतापर्यंत २२ राज्ये आणि १३ देशांपर्यंत आपले जाळे विस्तारले आहे. १० हजारांहून अधिक स्वयंसेवकांच्या मदतीने संस्थेने आतापर्यंत एक कोटींहून अधिक वृक्षलागवड पूर्ण केली असून, आता पाच कोटी वृक्षलागवडीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य त्यांनी समोर ठेवले आहे. या हरित अभियानात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या देशभरातील व्यक्ती व संस्थांचा गौरव आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जाणार आहे.
. या सोहळ्यामुळे महाराष्ट्र आणि राजस्थान या दोन राज्यांमधील पर्यावरण संवर्धनाचे विचार एका व्यासपीठावर येणार असून, भविष्यातील शाश्वत विकासासाठी हा मैलाचा दगड ठरणार आहे.


