Home सामाजिक ‘विकसित महाराष्ट्रा’त चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील

‘विकसित महाराष्ट्रा’त चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील

7

Ø पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांचा निर्धार

Ø महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

Ø शेतकरी कर्जमाफी, महिला सक्षमीकरण आणि घरकुल पट्टे वाटपावर पालकमंत्र्यांचा विशेष भर

Ø उत्कृष्ट कार्य करणा-यांचा सत्कार

चंद्रपूर : “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०४७ पर्यंत ‘विकसित भारताचे’ उद्दिष्ट ठेवले आहे. याच धर्तीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘विकसित महाराष्ट्र’ घडविण्याचा संकल्प केला आहे. शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित, वंचित आणि दुर्बल घटकांचा विकास हाच आमच्या सरकारचा मुख्य केंद्रबिंदू आहे. चंद्रपूर जिल्हा प्रशासन यासाठी युद्धपातळीवर काम करीत असून विकसित महाराष्ट्राच्या उभारणीत चंद्रपूर जिल्ह्याचे योगदान अग्रस्थानी राहील,” अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली.

.    पोलिस मुख्यालय येथे शुक्रवारी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय : २ लाखांपर्यंत कर्जमाफी

आपल्या भाषणात पालकमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी नुकतीच २ लाखांपर्यंत कर्जमाफीची ऐतिहासिक घोषणा केली आहे. तसेच ‘स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने’चा विस्तार आता शेतमजुरांपर्यंत करण्यात आला असून, त्यांनाही सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. पी.एम. किसान सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ लाख ४५ हजार ४७१ पात्र शेतकऱ्यांना एकूण १४८ कोटी रुपयांचे यशस्वी वितरण करण्यात आले आहे.

महिला सक्षमीकरण आणि शिक्षण क्षेत्रात भरारी

जिल्ह्यात महिला सक्षमीकरणासाठी ‘राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण योजना’ प्रभावीपणे राबविली जात आहे. यातून जिल्ह्यातील २०९ महिलांना विविध योजनांद्वारे १०० टक्के अनुदानावर लाभ दिला जात आहे. शैक्षणिक क्षेत्रात जिल्ह्याने मोठी कामगिरी केली असून, ‘निपुण भारत अभियाना’ंतर्गत ‘सुपर स्कूल’ घटकात चंद्रपूर जिल्ह्याने संपूर्ण राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

आरोग्य क्षेत्रात राष्ट्रीय मानांकन आणि टी.बी. मुक्त पंचायत

आरोग्य सेवेचा दर्जा उंचावण्यात चंद्रपूर जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांना आणि ४ उपकेंद्रांना राष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे. ‘टी.बी. मुक्त पंचायत’ मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ३४५ ग्रामपंचायतींनी क्षयरोग मुक्त होण्याचा बहुमान मिळवला आहे. तसेच सिकलसेल निर्मूलन मोहिमेअंतर्गत रुग्णांची नियमित चाचणी आणि उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिक्रमणे नियमित करून मालकी हक्क; नागरिकांना पट्टे वाटप

नागरिकांच्या हक्काच्या घराबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, १ जानेवारी २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियमानुकूल करून नागरिकांना जागेचा आणि घराचा मालकी हक्क देण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत यावेळी महानगरपालिकेच्या वतीने मंदा टेकाम, मारुती येरणे, मिरा नायडू, मिराबाई उराडे आणि शेहनाज जाकर अली यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते भूखंडाचे पट्टे वाटप करण्यात आले.

नागरिकांना पट्टे वाटप व सन्मान

यावेळी चंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने मंदा टेकाम, मारुती येरणे, मिरा नायडू, मिराबाई उराडे, शेहनाज जाकर अली यांना पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते पट्टे वाटप करण्यात आले. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त ॲङ क्षमा बारसकर, निता पंत, ॲङ भाग्यश्री फाटक यांचा, माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जिबगाव (ता.सावली), चिखली (ता. सावली), दुर्गापूर (ता. चंद्रपूर), भेजगाव (ता. मुल) या ग्रामपंचायतींचा, ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता प्रदीप बाराहाते, ग्राम महसूल अधिकारी नंदा हेपट, गुणवंत खेळाडू अश्विनी निमजे, हरमनसिंग मारबा, पंकज बेले यांचा पोलिस महासंचालकांचे बोधचिन्ह प्राप्त झालेले पोलिस निरीक्षक शिवाजी कदम, पोलिस उपनिरीक्षक विलास निकोडे, सुनील गौरकर आणि पोलिस हवालदार संदीप उपरे यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!