Home सामाजिक चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकपदी ‘दबंग’ आयुष नोपाणी यांचे पुनरागमन

चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकपदी ‘दबंग’ आयुष नोपाणी यांचे पुनरागमन

13

रेती माफिया आणि गुन्हेगारांचे दणाणले धाबे !

वरोरा उपविभागात रेती माफियांचे कंबरडे मोडणारा अधिकारी आता संपूर्ण जिल्ह्याची सूत्रे घेणार हाती

गुन्हेगारीमुक्त चंद्रपूरसाठी नागरिकांच्या उंचावल्या अपेक्षा

चंद्रपूर : राज्य शासनाच्या गृह विभागाने गुरुवारी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले असून, चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी आयुष नोपाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची अहिल्यानगर येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी आता नोपाणी जिल्ह्याची धुरा सांभाळतील. आयुष नोपाणी यांच्या रूपाने जिल्ह्याला पुन्हा एकदा एक कडक शिस्तीचा आणि ‘दबंग’ अधिकारी मिळाल्याने गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्ह्याचा दांडगा अनुभव आणि धडाकेबाज कामगिरी

आयुष नोपाणी यांचा चंद्रपूर जिल्ह्याचा अनुभव अत्यंत दांडगा आहे. यापूर्वी त्यांनी वरोरा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) म्हणून यशस्वी कामगिरी बजावली आहे. आपल्या त्या कार्यकाळात त्यांनी अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. जिल्ह्यातील रेती तस्करीवर आजवरची सर्वात मोठी कारवाई करण्याचे श्रेय नोपाणी यांनाच जाते. केवळ अवैध धंदेच नव्हे, तर वरोरा शहरातील आणि महामार्गावरील वर्षानुवर्षांपासूनचे अतिक्रमण हटवून त्यांनी प्रशासनाचा वचक निर्माण केला होता. त्यांच्या या धाडसी मोहिमांमुळे वरोरा उपविभाग गुन्हेगारीमुक्तीच्या दिशेने वाटचाल करू लागला होता.

गुन्हेगारांवर पोलिसांचा ‘धाक’ होणार निर्माण

मागील काही काळापासून जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांवरून पोलीस प्रशासनावर टीका होत होती. कोळसा चोरी, रेती तस्करी आणि गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या सक्रियतेमुळे नागरिक चिंतेत होते. अशा परिस्थितीत नोपाणी यांच्यासारख्या डॅशिंग अधिकाऱ्याची वर्णी लागल्याने सामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, आता संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आल्याने गुन्हेगारांवर पोलिसांचा मोठा वचक निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अवैध धंद्यांवर ‘चाप’ लावण्याचे मोठे आव्हान

जिल्ह्याच्या सीमेवरून होणारी तस्करी, कोळसा चोरी आणि वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एका कणखर नेतृत्वाची गरज होती, ती उणीव आता भरून निघाल्याची चर्चा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सुरू झाली आहे. पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर नोपाणी अवैध रेती तस्करी आणि कोळसा माफियांचे कंबरडे कसे मोडतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!