शिलभद्र मंडळ आणि टाटा कॅन्सर केअर फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम
कॅन्सर जनजागृतीवर भर
भद्रावती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून स्थानिक शिलभद्र मंडळ, गौतम नगर, भद्रावती यांच्या वतीने गुरुवारी, ३० एप्रिल रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अशोका बुद्ध विहार येथे संपन्न झालेल्या या शिबिरात परिसरातील ६५ नागरिकांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेत लाभ घेतला.
. या शिबिरासाठी टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन आणि तालुका ग्रामीण रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने सेवा दिली. यामध्ये टाटा कॅन्सर केअर फाउंडेशनचे डॉ. आशीष बारबदे, डॉ. ट्विंकल ढेंगळे, सूरज साळुंके, ज्योती मुरमाळकर, वैष्णवी सहारे, तसेच ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ऐश्वर्या महल्ले, नैना लोणकर, श्रुती कदम, माधुरी मत्ते, मंजुश्री मूर्ती, शुभम दुधे, शीतल भडके आणि तेजस्वी दुर्योधन यांचा समावेश होता.
. शिबिरादरम्यान नागरिकांची रक्तदाब, मधुमेह, थायरॉईड, आणि एच.आय.व्ही. तपासणी करण्यात आली. विशेषतः महिला आणि पुरुषांमध्ये वाढत्या कॅन्सरच्या धोक्याचा विचार करता, तोंडाचा कॅन्सर, स्तन कॅन्सर आणि गर्भाशयाच्या कॅन्सरची विशेष तपासणी करण्यात आली. यावेळी तज्ज्ञांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, कॅन्सरसारखा गंभीर आजार वेळेत लक्षात आल्यास आणि त्यावर त्वरित उपचार घेतल्यास पूर्णपणे मात करता येते. अनेक उदाहरणांच्या माध्यमातून उपस्थितांमध्ये याविषयी जनजागृती करण्यात आली.
. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिलभद्र मंडळाचे अध्यक्ष भारत खोब्रागडे यांच्यासह हरिदास जवादे, अनिल बांबोडे, प्रवीण चिमुरकर, नानाजी रामटेके, भावना खोब्रागडे, सारिका पथाडे, सागर कांबळे, हर्षल मेश्राम, संभव देशकर, सार्थक देशकर, प्रेरित लोणारे, अशित मेश्राम आणि शाश्वत कांबळे यांनी परिश्रम घेतले.


