Home चंद्रपुर जिल्हा विशेष शेती साहित्यावरील जाचक अटी त्वरित रद्द करा

शेती साहित्यावरील जाचक अटी त्वरित रद्द करा

20

खासदार प्रतिभा धानोरकर यांचा राज्य सरकारला सज्जड दम

कृषी केंद्र चालकांच्या बेमुदत संपामुळे खरीप हंगाम धोक्यात

तातडीने हस्तक्षेप करण्याची कृषीमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

चंद्रपूर : महाराष्ट्र सरकारने शेती उपयोगी साहित्याच्या विक्रीसंदर्भात लागू केलेले नवीन नियम अत्यंत जाचक असून, यामुळे राज्यातील कृषी केंद्र चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या नियमांविरोधात विक्रेत्यांनी २७ एप्रिल २०२६ पासून पुकारलेल्या बेमुदत बंदची तातडीने दखल घेऊन सरकारने सकारात्मक तोडगा काढावा, अशी आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

विक्रेत्यांच्या मागण्यांकडे शासनाचे वेधले लक्ष
खासदार धानोरकर यांनी राज्याच्या कृषी मंत्र्यांना या संदर्भात सविस्तर पत्र लिहिले आहे. ‘साथी ॲप’ द्वारे बियाणे विक्रीची सक्ती करणे आणि सीलबंद औषधींच्या विक्रीवरही तांत्रिक कारणास्तव विक्रेत्यांना दोषी धरणे हे अत्यंत अन्यायकारक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. राज्यातील १०० टक्के विक्रेत्यांनी या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासनाने यात त्वरित मध्यस्थी करणे गरजेचे आहे.

सरकारच्या दुहेरी भूमिकेवर थेट आरोप
एककीकडे अधिकृत विक्रेत्यांना प्रशासकीय जाचाला सामोरे जावे लागत असताना, दुसरीकडे बाजारपेठेत अनधिकृत ‘एच.टी.बी.टी.’ कापूस बियाणे आणि विनापरवाना एजंटमार्फत होणारी अवैध विक्री रोखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा थेट आरोप खासदार धानोरकर यांनी केला आहे. तांत्रिक अडथळे बाजूला ठेवून अधिकृत विक्रेत्यांवर होणारी नाहक दंडात्मक कारवाई सरकारने त्वरित थांबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

शेतकरी संतापल्यास संपूर्ण व्यवस्था कोलमडेल
“जर सरकारने विक्रेत्यांच्या समस्यांकडे वेळेत लक्ष दिले नाही, तर शेतकऱ्यांचा संताप अनावर होईल,” असा इशारा खासदार धानोरकर यांनी दिला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी केंद्रे बंद राहिल्यास खते आणि बियाण्यांचा मोठा तुटवडा निर्माण होऊन बळीराजाचे अतोनात नुकसान होऊ शकते. यामुळे केवळ व्यावसायिकच नाही, तर पर्यायाने संपूर्ण शेती व्यवस्थाच कोलमडून पडण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

.      परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कृषी मंत्र्यांनी या विषयात वैयक्तिक लक्ष द्यावे आणि जाचक अटी शिथिल करून हा बेमुदत संप मिटवावा, जेणेकरून खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणताही अडथळा येणार नाही, अशी आग्रही मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे.

error: Content is protected !!