Home चंद्रपुर जिल्हा विशेष कामात दिरंगाई न करता ठोस नियोजन करा

कामात दिरंगाई न करता ठोस नियोजन करा

6

आ. करण देवतळे यांचे नगर परिषद प्रशासनाला निर्देश

वरोरा नगर परिषदेत विकासकामांचा आढावा

तलावांचे सौंदर्यीकरण, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेवर दिला विशेष भर

वरोरा : शहराच्या प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार करण देवतळे यांनी वरोरा नगर परिषदेची विशेष आढावा बैठक घेतली. “जनहित आणि शाश्वत विकास हेच आमचे उद्दिष्ट असून, कामात दिरंगाई न करता ठोस नियोजन करा,” अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

.      या महत्त्वपूर्ण बैठकीत शहराच्या सौंदर्याकरणापासून ते वाढत्या अतिक्रमणापर्यंतच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने वरोरा शहरातील तलावांचे सौंदर्यीकरण करणे, शहरात वेगाने वाढत चाललेले अतिक्रमण रोखणे आणि नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित करणे यावर विशेष भर देण्यात आला.

.      आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांची नियमित साफसफाई, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता व देखभाल, तसेच संपूर्ण शहराच्या स्वच्छतेबाबत नवीन आणि प्रभावी नियोजन करण्याचे मुद्दे बैठकीत प्राधान्याने मांडण्यात आले. “नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. विकासकामांची अंमलबजावणी प्रभावीपणे करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा,” असा इशाराही आमदार देवतळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

.      या आढावा बैठकीला मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, नगराध्यक्षा अर्चना ठाकरे, विविध प्रभागांचे नगरसेवक, नगरसेविका तसेच नगर परिषदेचे संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शहराच्या स्वच्छतेच्या आणि नियोजनाच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत फलदायी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

error: Content is protected !!