Home चंद्रपुर जिल्हा विशेष भद्रावती ग्राहक पंचायतीचा धडाका !

भद्रावती ग्राहक पंचायतीचा धडाका !

16

अवघ्या १५ दिवसांत ४ पीडित ग्राहकांना मिळवून दिला न्याय

शिक्षण संस्था, नामांकित कंपन्या आणि आडमुठ्या दुकानदारांना दाखवला कायद्याचा बडगा

हजारो रुपये ग्राहकांच्या खिशात परत

अध्यक्ष प्रवीण चिमूरकर यांचा पुढाकार

भद्रावती : आपल्या हक्कांसाठी जागरूक राहून आवाज उठवला, तर न्याय नक्कीच मिळतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती शाखेने गेल्या १५ दिवसांत आलेल्या ४ विविध तक्रारींचे यशस्वी निवारण करून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. यामध्ये शिक्षण संस्थेची फसवणूक, मोबाईल टॉवर कंपनीचा निष्काळजीपणा, विक्रेत्यांची मुजोरी आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची सदोष सेवा अशा गंभीर प्रकरणांचा समावेश होता.

मोबाईल टॉवर कंपनीचा मनमानी कारभार थांबवला
रजनी शेंडे यांनी मोबाईल टावर कंपनी विरोधात प्लॉटवर खंदलेले गड्डे भरून देत नसल्याची तक्रार ग्राहक पंचायत महाराष्ट्र कडे केली होती. यावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती ने लगेच कारवाई करत मोबाईल टावर कंपनीला फ़ोन करून लवकरात लवकर खड्डे बुजवून देण्याचे सांगितले. त्यावर मोबाईल टावर कंपनीने तात्काळ कारवाई करत रजनी शेंडे यांच्या प्लॉटवरचे खड्डे जेसीबी द्वारे बुजवून दिले. अनेक दिवसापासून कंपनीच्या कारभारामुळे त्रासलेल्या शेंडे यांनी ग्राहक पंचायतचे आभार मानले.

नादुरुस्त फ्रीजची तीन महिन्यांची डोकेदुखी थांबली
रवी भांडारकर यांची फ्रीज मागील तीन महिन्यांपासून नादुरुस्त होती. कंपनीकडून कॉम्प्रेसर बदलून दिले होते. परंतु पुन्हा खराब झाल्याने ग्राहकाने कंपनी आणि दुकानदारासोबत अनेकदा संपर्क केला पण लवकर समाधान न झाल्याने ग्राहक रवी भांडारकर यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र कडे लिखित तक्रार दिली. त्यावर तत्काळ कारवाई करत ग्राहक पंचायत ने फ़ोन द्वारे दुकानदाराला संपर्क करून नादुरुस्त फ्रीज लवकर दुरुस्त करून देण्याचे सांगितले. दुकानदाराने सहकार्य करत कंपनीच्या टेक्निशन ला दुसऱ्याच दिवशी बोलावून नादुरुस्त फ्रीज दुरुस्त करून दिला.

विक्रेत्याला ‘ग्राहक कायद्या’चा हिसका ; वस्तू परत घेऊन दिले पैसे
नामदेव रामटेके यांनी दुकानातून कमोड शीट विकत घेतली होती. परंतु ती शीट बाथरूम मधे लावण्यास अडचण निर्माण होत असल्याने ग्राहकाने ती शीट दुकानदाराला परत घेण्यास विनंती केली. परंतु दुकानदाराने जास्त दिवस झाल्याने परत होणार नाही आहे सांगितले. त्यामुळे ग्राहकाने ग्राहक पंचायत महाराष्ट्रकडे तक्रार केली. तक्रारीची दाखल घेत ग्राहक पंचायत महाराष्ट्र ने दुकानदारासोबत संपर्क करून ग्राहक संरक्षण कायदा २०१९ बद्दल माहिती दिली आणि काय कारवाई होऊ शकते याबद्दल समजावून सांगितले. त्यानंतर दुकानदाराने लगेच त्याच दिवशी ग्राहकाची कमोड शीट परत घेतली आणि ग्राहकला त्याचे पैसे परत मिळाले.

शिक्षण संस्थेची उतरवली मुजोरी ; १० हजार रुपये परत
सोमेश्वर उपरे यांनी चंद्रपूर येथील एका शिक्षण संस्थेत मुलाचा १० हजार एडवांस देवून प्रवेश घेतला. संस्थांच्या प्रतिनिधीने सांगितल्या प्रमाणे संस्थेत तसे दिसून आले नाही. त्यामुळे ग्राहकाने एडमिशन रद्द करून पैसे परत करावे अशी संस्थेच्या संचालकाला विनंती केली. परंतु पैसे परत होणार नाही असे स्पष्ट ग्रहाला सांगण्यात आले. त्यामुळे ग्राहकाने त्रासून ग्राहक पंचायत महाराष्ट्र कडे धाव घेतली. ग्राहक पंचायत महाराष्ट्र चे अध्यक्ष प्रवीण चिमुरकर यांनी संस्थेच्या संचालकाला फ़ोन द्वारे संपर्क साधून ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नुसार संस्थाचालकावर कारवाई होऊ शकते याची सविस्तर माहिती दिली. यावर संचालकाने २ दिवसानंतर ग्राहकाचे पुणे पैसे परत करतो असे आश्वासन दिले आणि दोन दिवसांनंतर ग्राहकाचे पूर्ण पैसे परत मिळाले.

ग्राहकांनी घाबरू नये, आवाज उठवावा” – प्रवीण चिमूरकर
या धडाकेबाज कामगिरीनंतर अध्यक्ष प्रवीण चिमूरकर म्हणाले, “ग्राहकाने कोणत्याही कंपनी अथवा दुकानदाराविषयी तक्रार करायला घाबरू नये. न्यायासाठी ग्राहकाने आवाज उठवला च पाहिजे. जर एखादा विक्रेता ३० दिवसांच्या आत सदोष वस्तू परत घेत नसेल, खराब सेवा सुधारत नसेल किंवा तुमचे पैसे परत करत नसेल, तर ती एक अनुचित व्यापारी प्रथा मानली जाते. फक्त वस्तू विकत घेतांना दुकानदारांकडून पक्के बिल, वारंटी कार्ड नक्की घ्यावे. फसवणूक झाली असे वाटल्यास ग्राहक पंचायत महाराष्ट्र सोबत संपर्क करावा. ग्राहक पंचायत महाराष्ट्र नेहमी प्रामाणिक ग्राहकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.”

ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती चे अध्यक्ष प्रवीण चिमूरकर

या टीमने मिळवून दिला न्याय
या सर्व प्रकरणांत प्रवीण चिमूरकर यांच्या नेतृत्वाखाली डॉ. ज्ञानेश हटवार, वतन लोने, भारत खोब्रागडे, करुणा मोघे, सोनल वावरे, विनोद ठमके, गुरुदेव बावणे आणि प्रतीक्षा बनकर यांनी मोलाची भूमिका बजावली. या सर्व ग्राहकांनी ग्राहक पंचायतीच्या कार्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.

error: Content is protected !!