Home चंद्रपुर जिल्हा विशेष राधाकृष्ण कॉलनीत वीज संकट तीव्र

राधाकृष्ण कॉलनीत वीज संकट तीव्र

6

वारंवार खंडित पुरवठा व कमी व्होल्टेजमुळे नागरिक संतप्त

MSEB कार्यालयावर धडक

रेल्वे स्टेशन रोड परिसरातील रहिवाशांचे हाल

घरगुती उपकरणे निकामी, प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात निवेदन सादर

भद्रावती : शहरातील रेल्वे स्टेशन रोड परिसरातील राधाकृष्ण कॉलनीमध्ये मागील काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होणे तसेच कमी व्होल्टेजची समस्या तीव्र झाली आहे. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असून, या समस्येच्या निषेधार्थ संतप्त रहिवाशांनी उपअभियंता, MSEB कार्यालय, भद्रावती शाखा येथे धडक दिली व प्रशासनाला निवेदन सादर केले.

.       राधाकृष्ण कॉलनी (जुनघरे यांच्या घराजवळील डी.पी. परिसर) येथील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात सतत वीज पुरवठा खंडित होतो आणि आला तरी व्होल्टेज अत्यंत कमी असते. यामुळे घरातील फ्रिज, टीव्ही यांसारखी उपकरणे व्यवस्थित चालत नाहीत. वाढत्या उष्णतेच्या काळात कुलर आणि पाण्याचे बोअरपंप सुरू होत नसल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि उकाड्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

.       या वीज संकटामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही मोठा परिणाम होत असून, वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना जागरण करावे लागत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही संबंधित कार्यालयाकडे अनेकदा तोंडी व लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या, मात्र प्रशासनाने त्यावर कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

.       अखेर प्रशासनाच्या या उदासिनतेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट MSEB कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना जाब विचारला. निवेदनात परिसरातील वीज लाईन, ट्रान्सफॉर्मर व संबंधित यंत्रणेची तात्काळ दुरुस्ती करून कमी व्होल्टेजची समस्या त्वरित सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे.

.       या आंदोलनात सुशील ठेंगरे, धनराज बारापात्रे, कुशाल मानकर, शेखर तानकर, अजय कोहपरे, रविंद्र देऊरकर, रेखा धानोरकर, प्रतिभा ठेंगरे, वर्षा देऊरकर यांच्यासह कॉलनीतील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

 

error: Content is protected !!