Home सामाजिक महापालिकेने जागा द्यावी चंद्रपुरात राणी हिराईचा भव्यदिव्य पुतळा उभारणार – पालकमंत्री डॉ....

महापालिकेने जागा द्यावी चंद्रपुरात राणी हिराईचा भव्यदिव्य पुतळा उभारणार – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

1

Ø राजमाता राणी हिराई महोत्सव – 2026

चंद्रपूर : राजमाता राणी हिराई ह्या चंद्रपूर जिल्ह्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि वैभवशाली वारसा आहे. त्यांचा संघर्ष, पराक्रम आणि कर्तुत्वाची नवीन पिढीला ओळख व्हावी, यासाठी दरवर्षी राणी हिराई महोत्सवाचे आयोजन करण्यात येईल. एवढेच नाही तर चंद्रपूर महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून दिल्यास चंद्रपुरात राणी हिराईचा भव्यदिव्य पुतळा उभारला जाईल, यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी दिली.

.      आदिवासी विकास विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि महानगरपलिकेच्या वतीने चंद्रपूर येथील कोहिनूर तलाव परिसरात आयोजित राजमाता राणी हिराई जन्मोत्सवात उद्घाटक म्हणून पालकमंत्री डॉ. वुईके बोलत होते. यावेळी महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती सभापती मनस्वी    गि-हे, गोंडराजे केशव शहा महाराज आत्राम तसेच नगरसेवक आदी उपस्थित होते.

.      यावर्षीपासून प्रथमच राज्य शासनाच्या वतीने चंद्रपुरात राणी हिराई महोत्सवाला सुरवात झाली आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, चंद्रपूर महानगरपालिकेने त्वरीत जागा दिली तर पुढील वर्षीच्या महोत्सवापूर्वी राणी हिराई यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल. इतिहासात 23 गोंडराजे होऊन गेले. मात्र राणी हिराई ही एकमेव महिला राज्यकर्ती झाली. या महोत्सवाच्या माध्यमातून राणी हिराईचा इतिहास, त्यांचा त्याग आणि कार्याचे स्मरण लोकांसमोर येत आहे, ही अतिशय आनंदाची बाब आहे. आदिवासी समाजाच्या पाठिशी गौरवशाली इतिहास, अस्मिता आणि आदर्श संस्कृती आहे. ही संस्कृती कोणीही संपुष्टात आणू शकणार नाही.

.      आदिवासी समाजात 45 जाती आणि 181 उपजाती आहेत. यावर्षी प्रथमच संपूर्ण समाजाला एकत्र आणण्यासाठी तसेच गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्याचा पहिला आदिवासी पालकमंत्री म्हणून आपल्याला काम करण्याची संधी मिळाली आहे. 2026 पासून सुरू झालेला राजमाता राणी हिराई जन्मोत्सव दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जाईल, असेही पालकमंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले.

.      यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते ‘राणी हिराई’ या स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. तसेच मान्यवरांनी विविध स्टॉलची पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा आयुक्त अकुनुरी नरेश यांनी, संचालन एश्वर्या भालेराव यांनी केले. यावेळी आदिवासी समाजातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

राणी हिराईचे स्मारक आणि संग्रहालय व्हावे : खासदार प्रतिभा धानोरकर

पतीच्या निधनानंतर कमी वयात आपल्या साम्राज्याची जबाबदारी राणी हिराई यांनी सक्षमपणे सांभाळली. राणी हिराईच्या कार्याचा वसा, कर्तुत्वाचा उजाळा झाला पाहिजे, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. वुईके यांनी हिराई महोत्सवाची सुरवात केली. या परिसरात राणी हिराईचे भव्यदिव्य स्मारक तसेच एक मोठे संग्रहालय व्हावे, अशी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.

हिराई महोत्सवाला दरवर्षी निधी देणार : आमदार किशोर जोरगेवार

राणी हिराई यांनी 15 वर्षे राज्यकारभार सांभाळला. या काळात त्यांनी चंद्रपुरात महाकाली मंदीर, महादेव मंदीर, एकविरा मंदीर, पाण्यासाठी हौद बांधले. चंद्रपूरचा सांस्कृतिक वारसा जपावा, पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने यावर्षी प्रथमच राणी हिराई महोत्सवाला सुरवात झाली आहे. हा उत्सव दरवर्षी साजरा होणार असून त्यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीमधून निधी देऊ. तसेच राणी हिराई महोत्सवासाठी जिल्हा नियोजन समितीमध्येसुध्दा निधीची तरतुद करावी, असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

राणी हिराईचा जन्मोत्सव संकल्प करण्याचा दिवस : आमदार सुधीर मुनगंटीवार

राणी हिराईचे कर्तुत्व एव्हरेस्टपेक्षा मोठे आहे. राज्यकारभार करतांना जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी एक एक वास्तु तयार केली. या जन्मोत्सवाच्या निमित्ताने त्यांचे स्मरण करून संकल्प करण्याचा दिवस आहे, आदिवासी समाज हा प्रामाणिक, शूरवीर, पर्यावरणवादी आणि मेहनती आहे. मिशन शौर्य अंतर्गत आदिवासी विद्यार्थी एव्हरेस्टवर गेले,  असे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

नियुक्तीपत्रे व लॅपटॉपचे वितरण : यावेळी मान्यवरांच्या हस्ते शासकीय नोकरीमध्ये नियुक्त झालेल्या प्रणय मडावी, प्रशांत मडावी, सुप्रिया कुमरे यांना नियुक्तीपत्रे, उच्च शिक्षण घेणारे आदिती जुगनाके, सागर गेडाम यांना लॅपटॉप, शबरी योजनेंतर्गत दिगांबर खंडवाये, किशोर आत्राम यांना लाभ, रविना परतेती यांना शिवणयंत्रासाठी अर्थसहाय्य, वनिता पेंदोर यांना ताडपत्रीकरीता अर्थसहाय्य, चित्रकला स्पर्धेत प्रथम आलेली राधिका आगरकर, खुशाली गर्गेलवार (द्वितीय), शंकर भोयर (तृतीय), वकृत्व स्पर्धेत प्रांजल कोरांगे (प्रथम), प्रतिक्षा गेडाम (द्वितीय), क्रांतीवीर सिडाम (तृतीय) यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

error: Content is protected !!