Home सामाजिक ‘धार्मिक स्थळांचा विकास म्हणजे आत्मिक समाधानाचा सर्वोच्च क्षण’ — आ. सुधीर मुनगंटीवार

‘धार्मिक स्थळांचा विकास म्हणजे आत्मिक समाधानाचा सर्वोच्च क्षण’ — आ. सुधीर मुनगंटीवार

8

धाबा तीर्थक्षेत्राला ‘ब’ वर्ग दर्जा आणि ५० लाखांचा निधी मंजूर

आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार देवराव भोंगळे यांचा भव्य नागरी सत्कार

चंद्रपूर : “धार्मिक स्थळांचा विकास करणे म्हणजे केवळ सिमेंट-काँक्रीटचे बांधकाम किंवा पायाभूत सुविधा उभारणे नव्हे, तर त्या पवित्र वास्तूंच्या माध्यमातून समाजाला आध्यात्मिक बळ देणे होय. जनसेवेच्या आणि अशा पवित्र कार्यातून मिळणारे आत्मिक समाधान हेच माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठे यश आहे,” असे भावपूर्ण उद्गार राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

.      गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथील श्री संत परमहंस कोंड्या महाराज देवस्थानाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ’ योजनेअंतर्गत ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल आणि देवस्थानच्या विकासासाठी ५० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर केल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार आणि आमदार देवराव भोंगळे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पार्टीतर्फे १५ एप्रिल २०२६ रोजी धाबा येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न झाला.

ऐतिहासिक आणि धार्मिक क्रांतीचा आढावा
सत्काराला उत्तर देताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या कार्यकाळातील विविध ऐतिहासिक व धार्मिक प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जतन करणे आणि आपल्या तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य टिकवणे हे आमचे कर्तव्य आहे. शिखर शिंगणापूरचा विकास असो, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे कार्य असो किंवा पंढरपूर येथील नामसंकीर्तन सभागृह, प्रत्येक ठिकाणी श्रद्धेचा विचार केला आहे. श्रीशैलम येथे ध्यानमंदिर उभारण्यासोबतच राजुरा तालुक्यातील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठीही आम्ही निधी उपलब्ध करून दिला आहे.”

.      पुढे बोलताना त्यांनी ऐतिहासिक निर्णयांचा उल्लेख करत सांगितले की, अफजलखानाच्या कबरीवरील अतिक्रमण हटविणे, छत्रपती शिवरायांची जगदंबा तलवार आणि वाघनखे भारतात परत आणण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच थेट पाकिस्तानच्या बॉर्डरवर शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारणे, या गोष्टींमुळे मनाला एक वेगळेच समाधान मिळाले आहे.

धाबा परिसराच्या विकासाची ग्वाही
धाबा तीर्थक्षेत्राचा उल्लेख करताना ते म्हणाले की, या परिसराचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व मोठे आहे. या ठिकाणचा सर्वांगीण विकास करून भाविकांसाठी उत्तम सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.

आमदार देवराव भोंगळे यांचे संबोधन
यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी सुधीरभाऊंच्या कार्यशैलीचे कौतुक केले. “सुधीरभाऊंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज धाबा तीर्थक्षेत्राला हा दर्जा आणि निधी मिळू शकला आहे. या भागाचा प्रतिनिधी म्हणून मी सदैव भाऊंचा कार्यकर्ता म्हणूनच काम करेन आणि या देवस्थानच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहीन,” असे आश्वासन त्यांनी दिले.

मान्यवरांची मांदियाळी
या भव्य सोहळ्याला भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, अमर बोडलावार, दीपक सातपुते, किशोर अगस्ती, सुहास माडुरवार, विजय देशमुख, राजा चिलमंतवार, बबनराव पत्तीवार, राकेश पून, स्वप्निल अनमुलवार, इंद्रपाल घुळसे, निलेश पुलगमकर, वैष्णवी बोडलावार, नंदा घोगरे, अरुणा जांभूळकर, अश्विनी तोडासे, स्वाती वडपल्लीवार, बाबुराव बोमकंठीवार, भानेश थेगेवार यांच्यासह परिसरातील अनेक सरपंच, पदाधिकारी आणि हजारो भाविक उपस्थित होते.

.         या विकासकामामुळे धाबा परिसरात धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून स्थानिक व्यापार आणि अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचा समारोप जल्लोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

error: Content is protected !!