Home सामाजिक गाव कृती आराखड्याद्वारे आरोग्य संपन्न गावाचा संकल्प करा

गाव कृती आराखड्याद्वारे आरोग्य संपन्न गावाचा संकल्प करा

9

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आशा साळवे यांचे प्रतिपादन

विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘आरोग्य संपन्न अभियान’ कार्यशाळा उत्साहात

नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर समिती सक्रिय होणार

बल्लारपूर : नागरिकांना सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. याच उद्देशाने राज्यस्तरावर ‘आरोग्य संपन्न अभियान’ राबविले जात आहे. या अभियानांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्थापन होणाऱ्या आरोग्य संपन्न गाव कृती संनियंत्रण समितीने गावातील आरोग्य सेवांची स्थिती, अडचणी आणि सुधारणांचा सखोल अभ्यास करून गाव कृती आराखडा तयार करावा व आरोग्य संपन्न गावाचा संकल्प प्रामाणिकपणे यशस्वी करावा, असे प्रतिपादन बल्लारपूरच्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आशा साळवे यांनी केले.

.      बल्लारपूर तालुक्यातील विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने उपकेंद्र नांदगाव (पोडे) व शिवणी येथील आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांसाठी आयोजित कार्यशाळेत त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.

.      यावेळी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विसापूरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी कांबळे, तर उदघाटक म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आशा साळवे, प्रमुख अतिथी उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, वैद्यकीय अधिकारी प्रशांत मांडवे,डॉ. आदित्य तिवारी,केदारपवार यांची उपस्थिती होती.

लोकसहभागातूनच अभियान यशस्वी होणार
अध्यक्षीय भाषणात डॉ. अश्विनी कांबळे म्हणाल्या की, ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे एक महत्त्वाकांक्षी अभियान आहे. याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी केवळ आरोग्य विभागच नव्हे, तर गावातील लोकसहभाग देखील अत्यंत महत्त्वाचा आहे. गाव संनियंत्रण कृती समितीचे कार्य आणि ग्रामस्थांचे सहकार्य लाभल्याशिवाय हे अभियान यशस्वी होऊ शकणार नाही, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

.        या कार्यशाळेत समितीचे कार्य, जबाबदाऱ्या आणि आरोग्य आराखडा तयार करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. अभियानाच्या माध्यमातून गावातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य सेवा मिळवून देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

error: Content is protected !!