Home सामाजिक आ. सुधीर मुनगंटीवारांच्या ‘अर्धा तास चर्चे’ला मोठे यश

आ. सुधीर मुनगंटीवारांच्या ‘अर्धा तास चर्चे’ला मोठे यश

6

झरपट आणि इरई नदीच्या पुनरुज्जीवनासाठी शासन सरसावले

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून प्रदूषणाची प्रत्यक्ष पाहणी

पहिल्या टप्प्यात चंद्रपूरच्या नद्यांचा ‘नदी पुनर्जीवन प्राधिकरणात’ समावेश

चंद्रपूर : विधानसभेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या ‘अर्धा तास चर्चे’ला राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत, राज्याच्या पर्यावरण तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषणाचा व्यापक पाहणी दौरा केला. या दौऱ्यामुळे चंद्रपूर शहरातील वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नाला आता राज्य पातळीवर गांभीर्याने हाताळले जात असल्याचे स्पष्ट झाले असून, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला नद्यांच्या स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

नद्यांची पाहणी आणि ‘प्राधिकरणा’ची घोषणा
दौऱ्यादरम्यान पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी चंद्रपूर शहरातील झरपट नदीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी नदीतील प्रदूषणाची भीषण तीव्रता, मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा, औद्योगिक कचरा आणि सांडपाण्याचा प्रवाह याचा सखोल आढावा घेतला. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांनी प्रदूषणावर तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

.    यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी एक अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्या म्हणाल्या की, “राज्यात लवकरच ‘नदी पुनर्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यात येणार आहे. या प्राधिकरणाच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्यातील झरपट व इरई या दोन्ही नद्यांचा समावेश केला जाणार आहे.” या निर्णयामुळे या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी दीर्घकालीन, शाश्वत व परिणामकारक उपाययोजना राबविण्यास गती मिळणार आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवारांचा यशस्वी पाठपुरावा
२४ मार्च २०२६ रोजी विधानसभेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नद्यांच्या प्रदूषणाचा गंभीर मुद्दा उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. या चर्चेनंतरच शासनाने प्राधान्याने हा पाहणी दौरा निश्चित केला. आजच्या पाहणी दरम्यान मुनगंटीवार यांनी झरपट नदीचे धार्मिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले. केवळ तात्पुरत्या मलमपट्ट्या नकोत तर दीर्घकालीन उपाययोजना करा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून देत त्यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर पावले उचलण्याची गरज व्यक्त केली.

पशुवैद्यकीय सेवेचाही घेतला आढावा
नदीच्या पाहणीनंतर पंकजा मुंडे यांनी चंद्रपूर येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयाला भेट दिली. तेथील सुविधा, उपलब्ध मनुष्यबळ आणि सेवांचा आढावा घेऊन त्यांनी पशुपालकांना अधिक दर्जेदार व तत्पर सेवा देण्याच्या सूचना केल्या. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सुरेश कुंभरे यांनी त्यांचे स्वागत केले.

प्रशासकीय यंत्रणेचा मोठा ताफा
या दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, मनपा आयुक्त, महापौर संगीता खांडेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरसेवक राहुल पावडे, प्रज्वलंत कडू, नंदू नागरकर, वसंत देशमुख, सुरज पेदुलवार यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.      एकूणच, विधानसभेतील मुद्द्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यामुळे चंद्रपूरमधील प्रदूषणाच्या प्रश्नावर शासनाने थेट मैदानात उतरून कारवाईची दिशा निश्चित केली आहे. यामुळे चंद्रपूरकरांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला असून झरपट व इरई नद्यांच्या पुनरुज्जीवनाला नवी चालना मिळाली आहे.

error: Content is protected !!