अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दर्शनाचा सोहळा
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
गजानन महाराज, जगन्नाथ बाबा आणि बेंडोजी महाराजांच्या पादुकांचे होणार पूजन
भद्रावती : अध्यात्म आणि भक्तीची समृद्ध परंपरा लाभलेल्या भद्रावती नगरीत यंदाही संतांच्या पावन पादुकांचे मंगलमय आगमन होत आहे. स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर यांच्या वतीने अक्षय तृतीया आणि गुरुपुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर भव्य ‘पादुका दर्शन व पूजन’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा येत्या गुरुवारी, २३ एप्रिल रोजी बाजार वार्ड येथील विठ्ठल मंदिर परिसरातील रविंद्र शिंदे यांच्या निवासस्थानी पार पडणार आहे.
. या सोहळ्यात विदर्भाचे आराध्य दैवत श्री संत सद्गुरू गजानन महाराज (शेगाव), श्री संत सद्गुरू जगन्नाथ बाबा (भांडेवाडा) आणि श्री संत सद्गुरू बेंडोजी महाराज (घुईखेड) या थोर संतांच्या पादुकांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. दुपारी २ वाजेपासून दर्शनाला सुरुवात होणार असून रात्री ८ वाजेपर्यंत भाविकांसाठी द्वार खुले राहणार आहेत.
. “विसरू कसा मी गुरु पादुकेला..!” या भावनेने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या या सोहळ्याचे यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे आलेला अक्षय तृतीयेचा दुग्धशर्करा योग. दर्शनासोबतच भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. भद्रावती व परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नियोजक व समस्त विश्वस्त मंडळाने केले आहे. सध्या शिंदे कुटुंबीय व मित्र परिवारातर्फे सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.


