बल्लारपूर येथे पार पडली तालुकास्तरीय कार्यशाळा
‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान
बल्लारपूर : आजघडीला आपली जीवनशैली बदलत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या मानसिकतेतून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे अभियान सुरु करण्यात आले आहे. बल्लारपूर पंचायत समिती यात अग्रेसर राहील. या अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी गावकऱ्यांचा लोकसहभाग महत्वाचा असून अधिकारी व कर्मचार्यांच्या समन्वयक देखील महत्वाचा घटक आहे, असे प्रतिपादन बल्लारपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी बल्लारपूर येथे गुरुवार (दि. १६) रोजी केले.
. चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत बल्लारपूर पंचायत समितीच्या वतीने गोंडराजे खांडक्या नाट्यगृह बल्लारपूर येथे ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान तालुकास्तरीय कार्यशाळा पार पडली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
. कार्यशाळेचे उदघाटन जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. अशोक काटोळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी धनंजय साळवे होते. प्रमुख अतिथी म्हणून बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. गजानन मेश्राम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आशा साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश मामीडवार, डॉ. अश्विनी कांबळे, डॉ. रूबिना शेख, डॉ. डांगे, डॉ. वासनिक, गटशिक्षणाधिकारी सचिन माळवी, पंचायत विस्तार अधिकारी दिलीप बैलनवार, आरोग्य विस्तार अधिकारी साहेबराव पवार यांची उपस्थिती होती.
. यावेळी डॉ. अशोक कटाळे म्हणाले, शासनाने आरोग्य संपन्न महाराष्ट्र करण्यासाठी कौतुकास्पद उपक्रम सुरु केला आहे. यासाठी विविध स्तरावर बक्षीस देण्याची योजना आहे. आरोग्य ही मूलभूत गरज आहे. यासाठी माझं गाव, आरोग्य संपन्न गाव, ही संकल्पना महत्वाचे आहे. आपण लोकसहभाग घेऊन सदर अभियान यशस्वी करा,असे मनोगत व्यक्त करताना डॉ. कटाळे यांनी सांगितले. कार्यशाळेला बल्लारपूर तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या आदींची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.


