निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचे निर्देश
खा. प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपुरात ‘दिशा’ समितीची बैठक
शेत पाणंद रस्ते आणि शाळांच्या मनमानी कारभारावर ओढले ताशेरे
चंद्रपूर : केंद्र शासनाच्या वतीने जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आणि लोककल्याणकारी योजनांचा आढावा घेण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची’ (दिशा) महत्त्वपूर्ण बैठक आज नियोजन भवन येथे पार पडली. या बैठकीत रस्ते, रेल्वे, शिक्षण आणि पाणीपुरवठा यांसारख्या कळीच्या मुद्द्यांवरून प्रशासनाला खडे बोल सुनावत खासदारांनी तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
या महत्त्वाच्या विषयांचा झाला सविस्तर आढावा
बैठकीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र पुरस्कृत योजनांचा सविस्तर लेखाजोखा घेतला. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, बीएसएनएल – भारत नेट, प्रधानमंत्री खनीज क्षेत्र कल्याण योजना, आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) यांवर चर्चा करण्यात आली. तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ग्रामीण व शहरी आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, अमृत योजना, जलजीवन मिशन, प्रधानमंत्री कृषी सिंचन व विमा योजना, मृदा आरोग्य कार्ड, राष्ट्रीय आरोग्य मिशन, सर्व शिक्षा अभियान, एकात्मिक बालविकास आणि प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना अशा विविध विभागांच्या प्रगतीचा आढावा घेऊन प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
पाणीपुरवठा आणि अमृत योजनेवरून प्रशासनावर ताशेरे
चंद्रपूर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता महानगरपालिकेने पाणीपुरवठा योजनेचे सूक्ष्म नियोजन करणे आवश्यक असल्याचे खासदारांनी स्पष्ट केले. विशेषतः ‘अमृत’ योजनेचे काम अत्यंत संथ गतीने आणि निकृष्ट दर्जाचे होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे काम करणाऱ्या कंत्राटदारावर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी मनपा आयुक्तांना दिले.
शाळांची मनमानी आणि आरटीओची कडक तपासणी
खाजगी शाळांमधून शालेय साहित्याची सक्तीने होणारी विक्री थांबवण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले. “जी शाळा साहित्यासाठी पालकांवर जबरदस्ती करेल, त्यांच्यावर थेट कारवाई करा,” असे खासदारांनी ठणकावून सांगितले. तसेच, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आरटीओने स्कूल बसेसची फिटनेस तपासणी करावी आणि रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
शेतकऱ्यांची सोय आणि पायाभूत सुविधा
राष्ट्रीय महामार्गालगत सर्व्हिस रोड नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी त्रास होत आहे. महामार्ग प्राधिकरणाने कंत्राटदारांकडून हे काम तातडीने करून घ्यावे, असे बैठकीत सांगण्यात आले. यासोबतच वर्धा-बल्लारशहा रेल्वेच्या तिसऱ्या लाईनच्या कामात स्थानिक यंत्रणेला विश्वासात घेणे आणि गावागावांतील शेत पाणंद रस्ते प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
अंगणवाड्यांमध्ये तक्रार फलक लावण्याचे आदेश
ग्रामीण भागातील बालकांना दिला जाणारा पोषण आहार दर्जेदारच असावा. यामध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. नागरिकांना तक्रार करता यावी यासाठी प्रत्येक अंगणवाडीत तक्रार निवारण फलक लावण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.
. या बैठकीला महापौर संगिता खांडेकर, आमदार देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख आणि समितीचे सदस्य उपस्थित होते.


