चंदनखेडा उपबाजार केंद्रावर हमीभावाने खरेदीला सुरुवात
शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक आधार
भद्रावती : बळीराजाला त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा या उद्देशाने, कृषी उत्पन्न बाजार समिती भद्रावती अंतर्गत असलेल्या चंदनखेडा उपबाजार मार्केट यार्ड येथे ६ एप्रिलपासून शासनाच्या आधारभूत किमतीने (हमीभाव) हरभरा आणि तूर खरेदी प्रक्रियेचा शानदार शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे आणि बाजार समिती भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने हा महत्त्वाचा उपक्रम राबविला जात आहे.
. या खरेदी प्रक्रियेचे उद्घाटन बाजार समितीचे सभापती राजेंद्र डोंगे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी उपसभापती अश्लेषा जिवतोडे (भोयर), संचालक ज्ञानेश्वर डुकरे, गजानन उताणे, कानोबा तिखट, श्यामदेव कापटे, शांताबाई रासेकर, भानुदास गायकवाड, राजू आसुटकर, सचिव नागेश पुनवटकर तसेच केंद्राचे प्रमुख विठ्ठल टोंगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
. खरेदीच्या पहिल्याच दिवशी धानोली येथील शेतकरी गिरीधर धांडे, पंकज विधाते, गजानन खामणकर आणि बिजोनी येथील शेतकऱ्यांनी आपला हरभरा विक्रीसाठी आणला होता. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या शेतकऱ्यांचे श्रीफळ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.
. “शासकीय हमीभावामुळे बाजारातील दरांच्या चढ-उतारांपासून शेतकऱ्यांचे संरक्षण होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मोठी मदत होईल,” असा विश्वास सभापती राजेंद्र डोंगे यांनी यावेळी व्यक्त केला. या केंद्रावर शेतकऱ्यांना खरेदी प्रक्रियेची माहिती आणि आवश्यक कागदपत्रांबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
. भद्रावती परिसरातील तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी खुल्या बाजारातील कमी दराचा फटका सोसण्याऐवजी, या शासकीय खरेदी केंद्राचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

