Home चंद्रपुर जिल्हा विशेष लोहाडोंगरी खाण प्रकल्प रद्द करा

लोहाडोंगरी खाण प्रकल्प रद्द करा

309

खा. प्रतिभा धानोरकर यांची केंद्रीय कोळसा मंत्र्यांकडे आग्रही मागणी

केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांचा सकारात्मक प्रतिसाद

वेकोली आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरच संयुक्त बैठक

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील प्रस्तावित लोहाडोंगरी खाण प्रकल्पामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान आणि वेकोली (WCL) क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्हयातील ज्वलंत प्रश्न मांडले असून, मंत्र्यांनी यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.

वन्यजीव आणि पर्यावरणाचा धोका
खासदार धानोरकर यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, लोहाडोंगरी हा परिसर एक महत्त्वाचा ‘व्याघ्र भ्रमणमार्ग’ आहे. या ठिकाणी खाणकाम सुरू झाल्यास वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाचा नाश होईल आणि मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होईल. त्यामुळे हा विनाशकारी प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.

शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेकोलीचा प्रश्न
वेकोलीच्या वणी, बल्लारपूर, माजरी आणि वणी-नॉर्थ क्षेत्रातील पवन खाण, विरूर-गाडेगाव, पैनगंगा, निलजई यांसारख्या खाणींसाठी जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. मात्र, तांत्रिक कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांची उर्वरित जमीन अद्याप वेकोलीने ताब्यात घेतलेली नाही. या जमिनीवर शेती करणे आता अशक्य झाले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. तसेच खाणींतील मातीचे ढिगारे शेतशिवाराजवळ टाकल्याने आणि रस्ते बंद झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे, असे खासदारांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

मंत्र्यांचे आश्वासन आणि पुढचे पाऊल
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मागणीची दखल घेत केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी वेकोलीचे अध्यक्ष आणि सर्व क्षेत्रीय महाव्यवस्थापक यांच्या उपस्थितीत एक संयुक्त बैठक आयोजित करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

.         “पर्यावरण संरक्षण आणि शेतकऱ्यांचे हित जोपासणे ही आपली प्राथमिकता आहे,” असा विश्वास खासदार धानोरकर यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आणि पर्यावरण प्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!