पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे संताप
अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी, संसार होताहेत उद्ध्वस्त
‘एकता ग्राम संघटने’चे प्रशासनाला निवेदन
वरोरा : तालुक्यातील वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येन्सा येथे गेल्या अनेक दिवसांपासून अवैध देशी-विदेशी दारूची सर्रास विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे, नागपूर-चंद्रपूर हायवेलगत असलेल्या या गावात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा फायदा दारू विक्रेते घेत आहेत. या मुजोर विक्रेत्यांना आवर घालण्यासाठी आता ‘एकता ग्राम संघटने’च्या महिलांनी पुढाकार घेतला असून उपविभागीय अधिकारी व पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले आहे.
विक्रेत्यांची मुजोरी आणि प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष ?
गावातील महिलांनी आरोप केला आहे की, दारू विक्रेते अत्यंत मुजोर झाले असून विरोध करणाऱ्या महिलांना शिवीगाळ करतात. “आम्ही पोलिसांना हप्ते देतो, फुकट दारू विकत नाही,” अशी उत्तरे देऊन हे विक्रेते प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. काही वर्षांपूर्वी महिलांनी संघटित होऊन दारू बंद केली होती, मात्र आता पुन्हा या अवैध व्यवसायाने डोके वर काढले आहे.
तरुणाई व्यसनाच्या गर्तेत
या अवैध दारू विक्रीमुळे गावातील शांतता भंग पावली असून, शाळकरी व अल्पवयीन मुलेही व्यसनाधीनतेच्या आहारी जात आहेत. अनेक संसार यामुळे उद्ध्वस्त होत असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
. येन्सा येथील एकता ग्राम संघाने २२ मार्च २०२६ रोजी गावात सभा घेऊन याविरोधात ठराव मंजूर केला आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेऊन दारू विक्रेत्यांच्या मुसक्या न आवळल्यास एखादी अनुचित घटना घडू शकते, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. आता पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभाग यावर काय ठोस कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


