Home सामाजिक इरई नदी खोलीकरणासाठी लोकसहभाग महत्त्वाचा – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

इरई नदी खोलीकरणासाठी लोकसहभाग महत्त्वाचा – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके

322

विठ्ठल मंदिर प्रभाग येथे खोलीकरण अभियान टप्पा-२चा थाटात शुभारंभ

४ किमी क्षेत्रातून गाळ काढण्याचे उद्दिष्ट

चंद्रपूर : “इरई नदी ही चंद्रपूरची जीवनवाहिनी आहे. शहराच्या सर्वांगीण विकासात चंद्रपूरचा कायापालट झाला असला, तरी इरई नदीचे खोलीकरण दुर्लक्षित राहिले होते. ही नदी आपली आहे, या भावनेतून चंद्रपूरकरांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा,” असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

.      चंद्रपूर शहरात विठ्ठल मंदिर प्रभाग येथे इरई नदी खोलीकरण अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचे (२०२६) भूमीपूजन आणि यंत्रसामग्रीचे पूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.

भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक काम होईल
यावेळी बोलताना डॉ. वुईके म्हणाले की, खोलीकरणाच्या कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. तसेच, या कामात एका पैशाचाही भ्रष्टाचार होऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. “कोणीही याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, तर ही एक लोकचळवळ बनावी,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मनपाने या कामासाठी प्रभागनिहाय वेळापत्रक तयार करावे, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

पूर संरक्षणासाठी आमदारांच्या महत्त्वाच्या मागण्या
कार्यक्रमाला उपस्थित आमदार किशोर जोरगेवार यांनी नदीकाठच्या पूर परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “चौराळा पूल ते माना टेकडी हा ४ किमीचा टप्पा शहरासाठी अत्यंत संवेदनशील आहे. याच भागामुळे शहरात पूर येतो. त्यामुळे कंत्राटदारांनी वेकोलीच्या ओव्हरबर्डनचा (मातीचा ढिगारा) भाग कमी करण्याला प्राधान्य द्यावे.” तसेच, या भागात पूर संरक्षण भिंत बांधावी आणि स्थानिक घाटासाठी १ कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

असा आहे अभियान टप्पा-२चा आराखडा
इरई नदी चंद्रपूर शहराला ९ किमी समांतर वाहते. व्याप्ती चौराळा पूल ते माना टेकडी (४ किलोमीटर लांबी), लक्ष्य या टप्प्यात २ लक्ष ८० हजार टीसीएम (TCM) गाळ काढण्याचे प्रस्तावित आहे. मागील कामगिरी (२०२५) पहिल्या टप्प्यात रामसेतू ते चौराळा पूल (२.५ किमी) दरम्यान ८२.६१ टीसीएम गाळ काढण्यात आला होता. असे या अभियानाचे नियोजन आहे.

उपस्थित मान्यवर
या सोहळ्याला महापौर संगीता खांडेकर, आमदार किशोर जोरगेवार, उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती सभापती मनस्वी गिऱ्हे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

.       कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपा आयुक्त अकुनूरी नरेश यांनी केले, संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन उपायुक्त शेषराव टाले यांनी मानले.

error: Content is protected !!