करवाढ शून्य, पायाभूत सुविधा व आरोग्यावर भर
२८.७६ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प
अमृत २.० आणि मलनिस्सारण प्रकल्पांसाठी मोठी तरतूद
नगरसेवक स्वेच्छा निधीत तिप्पट वाढ
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा सुमारे ७४६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. स्थायी समिती सभापती सौ. मनस्वी गिऱ्हे यांनी हा अर्थसंकल्प महापौरांकडे सुपूर्द केला. विशेष म्हणजे, आगामी वर्षात शहरवासीयांवर कोणतीही नवीन करवाढ लादण्यात आलेली नाही. हा २८.७६ कोटी रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प असून, यामध्ये शहराच्या सर्वांगीण विकासासह पायाभूत सुविधा, आरोग्य आणि स्वच्छतेवर विशेष भर देण्यात आला आहे.
पाणीपुरवठा आणि मलनिस्सारणासाठी विक्रमी तरतूद
शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता, ‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत पाणीपुरवठा सुधारण्यासाठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, शहरातील सांडपाण्याच्या नियोजनासाठी मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्पासाठी (STP) १०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामुळे शहराच्या स्वच्छतेचा आणि आरोग्याचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे.
आरोग्य आणि पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण
आरोग्य सेवांच्या आधुनिकीकरणासाठी २२.४९ कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांसाठी ३ कोटी, तर नाली बांधकामासाठी स्वतंत्र २ कोटी रुपये प्रस्तावित आहेत. रस्ते सुरक्षा जनजागृतीसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
समावेशक विकास आणि कल्याणकारी योजना
महानगरपालिकेने समाजातील सर्व घटकांचा विचार करत महिला व बालकल्याणासाठी २.२८ कोटी, दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी १.४२ कोटी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी १.५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच, अंत्यविधी अनुदानात वाढ करून ते २,००० रुपयांवरून ३,००० रुपये करण्यात आले आहे.
नगरसेवक निधीत वाढ आणि कर्मचाऱ्यांचे मानधन
प्रभागातील विकासकामांना गती देण्यासाठी नगरसेवक स्वेच्छा निधी ५ लाखांवरून थेट १५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. याशिवाय, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी १४.८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पर्यावरण आणि सौंदर्यीकरण
चंद्रपूरला हरित आणि सुंदर शहर बनवण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत ई-बसवर भर दिला जाणार आहे. शहर सौंदर्यीकरणासाठी ५० लाख आणि प्रमुख चौकांच्या सुशोभीकरणासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
उत्पन्नाचे स्रोत
महानगरपालिकेला मालमत्ता कर, विविध शुल्क, जीएसटी अनुदान, १५ वा वित्त आयोग आणि केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांतून ४०३.४९ कोटींचे अनुदान अपेक्षित आहे.
“आम्ही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, आरोग्य आणि स्वच्छतेवर भर दिला आहे. कोणतीही करवाढ न करता सर्व घटकांना न्याय देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. हा अर्थसंकल्प चंद्रपूरला आधुनिक व सक्षम शहराच्या दिशेने नेणारा ठरेल.” सौ. मनस्वी गिऱ्हे, सभापती, स्थायी समिती.


