आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास
मातृशक्तीच्या उत्साहाने भारावले घुग्घुस
सांस्कृतिक महोत्सवात ऊर्जा आणि प्रतिभेचा संगम
चंद्रपूरची परंपरा, पराक्रम आणि संस्कृतीचा गौरव करत प्रार्थना बेहरे यांचे मनापासून स्वागत
चंद्रपूर : घुग्घुस येथे आयोजित सांस्कृतिक महिला महोत्सवात उपस्थित राहून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी “हा मंच मन जिंकण्याचा आहे आणि जो मन जिंकतो तो जगही जिंकू शकतो” असा प्रेरणादायी संदेश देत कार्यक्रमाची सुरुवात केली. दरवर्षी या महोत्सवात सहभागी होताना येथे मिळणारी ऊर्जा, मातृशक्तीचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि कार्यकर्त्यांची तळमळ यामुळे घुग्घुस ही केवळ एक नगरी नसून प्रेरणेचे केंद्र असल्याचे आ.मुनगंटीवार यांनी नमूद केले.
. यावेळी आमदार देवराव भोंगळे, अर्चना भोंगळे, महामंत्री विवेक बोढे, किरण बोढे यांच्यासह कार्यक्रमासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींचे आ. मुनगंटीवार यांनी विशेष कौतुक केले. गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देत त्यांनी माता महाकालीच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना व्यक्त केली.कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांचे आ.मुनगंटीवार यांनी स्वागत केले.
. चंद्रपूर जिल्ह्याचा अभिमानास्पद इतिहास अधोरेखित करत आ.मुनगंटीवार म्हणाले,जगातील सर्वाधिक वाघ असलेला जिल्हा, बाबा आमटे यांच्या सेवाभावाने पावन झालेले आनंदवन, स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक योगदान आणि देशासाठी सर्वाधिक सुवर्णदान करणारा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. तसेच औद्योगिकदृष्ट्या सक्षम असलेला हा जिल्हा इतर शहरांना ऊर्जा देण्याचेही काम करतो, याचाही आ. मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.
. घुग्घुसच्या मातृशक्तीने आयोजित केलेल्या या भव्य महोत्सवाचे त्यांनी विशेष कौतुक करत या मंचावरून अनेक कलावंत घडू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या वर्षी अभिनेत्री रवीना टंडन यांनी या महिलांना सोबत घेऊन एक चित्रपट करण्याचा विचार मांडला होता. स्थानिक कलाकारांमध्ये अपार क्षमता असल्यामुळे ते नक्कीच शक्य आहे, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.
. कार्यक्रमादरम्यान नामदेव बदखल यांनी सादर केलेल्या गीताचेही त्यांनी कौतुक केले. “सी फॉर चंद्रपूर म्हणजे सी फॉर चॅम्पियन” असे म्हणत त्यांनी उपस्थित भगिनींना आत्मविश्वासाने उंच भरारी घेण्याचे आवाहन केले.या सांस्कृतिक महिला महोत्सवाच्या माध्यमातून समाजातील महिलांना स्वतःची कला सादर करण्यासाठी मिळालेला मंच अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत, उपस्थित सर्वांना आ.मुनगंटीवार यांनी शुभेच्छा दिल्या.


