Home सामाजिक विसापूरच्या महिलांनी उभारली सौहार्दाची गुढी !

विसापूरच्या महिलांनी उभारली सौहार्दाची गुढी !

185

प्रबोधन व कीर्तनातून दिला सामाजिक जागृतीचा संदेश

जय दुर्गा भजन व शेतकरी, शेतमजूर महिला मंडळाचे अनोखे आयोजन

बल्लारपूर : मराठी महिन्यातील चैत्र म्हणजे मराठी माणसाचा चैतन्याचा दिवस. गुढीपाडव्याला शेतकरी सांजोनी करून भरघोस पिकांची कामना करतो, तर मराठी मन गुढी उभारून मंगलकामना व नववर्षाचा संकल्प करते. मात्र, बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील महिलांनी एकत्र येऊन यंदाचा मराठी नववर्ष दिन अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा केला. प्रबोधन कार्यक्रम व कीर्तनातून सामाजिक जागृतीचा संदेश देत जय दुर्गा महिला भजन मंडळ व शेतकरी, शेतमजूर महिला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विसापूर येथे खऱ्या अर्थाने सामाजिक सौहार्दाची गुढी उभारून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

.      विसापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, सार्वजनिक मंचावर गुढीपाडव्याचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्त्या आशा काळे यांच्या अध्यक्षतेखाली समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथींच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व दीपप्रज्वलनाने करण्यात आले.

कीर्तनातून महापुरुषांचा जागर
यावेळी सप्त खंजरी वादक जयश्री गावतुरे यांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई आणि राजमाता जिजाऊ यांचा आदर्श समाजाने घ्यावा, असा जागृतीचा संदेश त्यांनी दिला. प्रबोधनपर उपक्रमाचे मान्यवरांनी भरभरून कौतुक केले.

महिलांनी नवसमाज निर्मितीचा ध्यास घ्यावा – प्रा. डॉ. अनिल डहाके
मुख्य मार्गदर्शक प्रा. डॉ. अनिल डहाके यांनी यावेळी मौलिक मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “आपली संस्कृती सण व उत्सव साजरे करणारी आहे आणि हे सर्व आपल्या शेती व्यवसायाशी जोडलेले आहे. शेतीचा पहिला सण गुढीपाडवा आहे. महिला सशक्तीकरणाचा पाया महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रचला, तर त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक दर्जा दिला. समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी आपण सर्वांनी संविधानाचा अंगीकार करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी महिलांनी नवसमाज निर्मितीचा ध्यास घ्यावा.”

मान्यवरांची उपस्थिती व सहकार्य
याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून उपप्राचार्य प्रा. रत्नाकर चटप, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे, विसापूरचे उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, माजी जि.प. सदस्या सुमन गौरकार, सुरेश पंदीलवार, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, रिना कांबळे, सुरज टोमटे, मुरलीधर बोडखे, हरिदास टोंगे, सामाजिक कार्यकर्ते मधुकर भोयर व मंजुषा पावडे यांची उपस्थिती होती.

.      कार्यक्रमाचे प्रास्ताविक जय दुर्गा महिला भजन मंडळाच्या अध्यक्षा मंजुषा पावडे यांनी केले. संचालन नैना काळे यांनी तर आभार प्रदर्शन ओमेश्वरी जुनघरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छाया जुनघरे, आशा उपरे, नंदा पेंदोर, कुसुम भोजेकर, कमला येलेकर, पुजा डाहुले, छाया टोंगे, मंजुषा टोंगे, शशीकला वडस्कर, अल्का भोयर, अनिता वडस्कर, सरिता कुत्तरमारे, राधा वडस्कर, देविका टोंगे, जिजा गोहणे आदींनी अथक परिश्रम घेतले.

error: Content is protected !!