निसर्ग शिक्षणातून वन संवर्धनाचा संदेश
वन विभागाच्या स्तुत्य उपक्रमातून ४० विद्यार्थ्यांनी घेतला जंगलाचा आनंद
भद्रावती : पीएमसी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चंदनखेडा येथील विद्यार्थ्यांनी ‘चला माझ्या ताडोबाला’ या उपक्रमांतर्गत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाची सफारी केली. निसर्ग शिक्षणातून वन संवर्धन या मुख्य उद्देशाने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
. चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य पर्यटन आकर्षण असलेल्या ताडोबा सफारी दरम्यान विद्यार्थ्यांनी विविध वन्यजीव, दुर्मिळ वनस्पती आणि जंगल संवर्धनाचे महत्त्व जाणून घेतले. या सफारीत विद्यार्थ्यांना वाघ, चितळ, सांबर, नीलगाय, मोर यांसारखे विविध पशुपक्षी जवळून पाहण्याची संधी मिळाली.
. वन विभागामार्फत या सफारीसाठी मोफत शासकीय वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी १२ वाजता शाळेतून विद्यार्थ्यांनी प्रवासाला सुरुवात केली. या उपक्रमात ताडोबा शिक्षण अधिकारी सौ. राजेश्वरी दयालवार यांनी विद्यार्थ्यांना प्राण्यांच्या सवयींविषयी सविस्तर माहिती दिली. वाहन चालक संदीप पाटील व राकेश कराडे यांनी विशेष सहकार्य केले.
. ग्रामीण भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत निसर्ग सफारी घडवून आणल्याबद्दल पालकांनी वन विभागाचे आभार मानले आहेत. या सफारीमध्ये शाळेतील ४० विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापिका अनिता आईंचवार, सहाय्यक शिक्षिका कविता हनवते आणि सहाय्यक शिक्षक दिनेश उईके सहभागी झाले होते.


