बनावट मद्याची वाहतूक करणारी स्कॉर्पिओ जप्त, एकाला अटक
१२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
बोर्डा चौक परिसरात सापळा रचून धाडसी कारवाई
वरोरा : चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात बनावट देशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओसह एका तरुणाला अटक करण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा पथकाला मोठे यश आले आहे. या कारवाईत मद्य आणि वाहन असा एकूण अंदाजे १२ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय ?
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा पथकाला एका गोपनीय बातमीदाराकडून विश्वासार्ह माहिती मिळाली होती की, मोजे बोर्डा ते राधा मिलन मंगल कार्यालय या मार्गावरून एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ (क्रमांक MH-34-CD-3336) मधून बनावट मद्याचा मोठा साठा नेला जाणार आहे. या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ हालचाली करत १३ मार्च २०२६ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास बोर्डा चौक परिसरात नाकाबंदी केली.
मोठा मद्यसाठा जप्त
संबंधित संशयास्पद वाहन येताच पथकाने त्याला अडवून झडती घेतली. वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये ‘रॉकेट’ कंपनीच्या संत्रा देशी दारूचे ९० मिली क्षमतेचे एकूण ५० बॉक्स (एकूण ५००० नग) मिळून आले. प्राथमिक तपासात हा मद्यसाठा बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईत २ लाख रुपयांचे मद्य आणि १० लाख १९ हजार रुपये किमतीचे वाहन, असा एकूण १२ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीवर गुन्हा दाखल
या प्रकरणी आशिष रमेश मीटपल्लीवार (२३ वर्षे, रा. बोर्डा, ता. वरोरा) याला जागीच ताब्यात घेण्यात आले. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ आणि भारतीय न्याय संहिता १२३ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पथकाची कामगिरी
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विनय गौडा, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपआयुक्त गणेश पाटील आणि अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत निरीक्षक प्रवीण मोहतकर, दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार, सागर दिडसे, प्रमोद रजोते, हर्षराज इंगळे, तसेच जवान विलास महाकुलकार, जितेंद्र आनंद, जगदीश मस्के, मंगेश कुयटे, अमोल भोयर, किशोर पेदुजवार आणि शुभम गोवरदीपे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सदर प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सचिन पोलेवार करीत आहेत.


