प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या उपस्थितीत रंगणार ‘स्त्री-शक्तीचा जागर’
खासदार प्रतिभा धानोरकर यांची संकल्पना
चंद्रपूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर शहरात महिलांसाठी दोन विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमांद्वारे महिलांच्या क्रीडा कौशल्याला आणि कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या अंतर्गत भव्य महिला क्रिकेट स्पर्धा आणि ‘न्यू होम मिनिस्टर’ हा सांस्कृतिक सोहळा उत्साहात पार पडणार आहे.
![]()
. महिलांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी आणि खेळाडूवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘टिकी टाका टर्फ’, बायपास रोड येथे १४ व १५ मार्च २०२६ रोजी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत २१,००० रुपयांचे प्रथम पारितोषिक, १५,००० रुपयांचे द्वितीय आणि ११,००० रुपयांचे तृतीय पारितोषिक रोख रक्कम व चषकासह देण्यात येणार आहे. याशिवाय वुमन ऑफ द सिरीजसाठी ड्रेसिंग टेबल, बेस्ट बॅट्समनसाठी कुलर आणि बेस्ट बॉलरसाठी डिनर सेट अशी आकर्षक वैयक्तिक बक्षिसेही दिली जाणार आहेत.
. क्रीडा स्पर्धेसोबतच आज शनिवार, १४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता गांधी चौक येथील महानगरपालिका पटांगणात ‘कर्तृत्ववान महिलांचा गौरव व सांस्कृतिक सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे राहणार असून, उद्घाटन खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते होईल.
. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुभाष धोटे, विधान परिषद आमदार सुधाकर अडबाले, महासचिवा सुनंदा धोबे आणि जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कुंदा जेनेकर उपस्थित राहतील. सोहळ्याचे मुख्य आकर्षण ‘न्यू होम मिनिस्टर: खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम असून यात मानाची पैठणी जिंकण्याची संधी महिलांना मिळणार आहे.
. या सोहळ्यात जिल्ह्यातील विविध नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये एकता समर्थ (मूल), दीप्ती सोनटक्के (घुग्घुस), अर्चना ठाकरे (वरोरा) आणि अल्का वाढई (बल्लारपूर) या सत्कारमूर्तींचा प्रामुख्याने समावेश आहे. आपल्या कर्तृत्वाने शहराचा लौकिक वाढवणाऱ्या या रणरागिणींचा गौरव या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य ठरेल.
. चंद्रपूर शहरातील जास्तीत जास्त महिलांनी या क्रिकेट स्पर्धांमध्ये आणि ‘न्यू होम मिनिस्टर’ या सांस्कृतिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक मराठा चॅरिटेबल ट्रस्ट आणि चंद्रपूर शहर व जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. महिलांच्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या या उपक्रमामुळे जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


