Home सामाजिक क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंतीनिमित्त चंद्रपुरात आदिवासी मेळाव्याचा उत्साह

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके जयंतीनिमित्त चंद्रपुरात आदिवासी मेळाव्याचा उत्साह

195

आरोग्य शिबिर आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून उमटला आदिवासी संस्कृतीचा जागर

जिल्हाधिकारी व महापौरांची प्रमुख उपस्थिती

चंद्रपूर : स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीचे औचित्य साधून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांच्या वतीने गुरुवारी भव्य आदिवासी मेळावा, आरोग्य शिबिर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचे जतन करत क्रांतिवीरांच्या बलिदानाचा इतिहास आणि त्यांच्या गौरवशाली कार्याची आठवण पुन्हा एकदा ताजी करण्यात आली.

.      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर शहराच्या महापौर संगिता राजेंद्र खांडेकर होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे आणि प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित होते. याशिवाय व्यासपीठावर नगरसेविका सुशिला सिडाम, सरला कुळसंगे, नगरसेवक कुलमेथे, शहर ठाणेदार रामटेके, ॲड. संतोष कुळमेथे, मीनाताई आत्राम, महिपाल मडावी, प्रतिक कुळसंगे आणि अरुण मडावी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

.      कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिरात शेकडो आदिवासी बांधवांची सिकलसेल, मधुमेह, रक्तदाब आणि दंत तपासणी करण्यात आली. गरजूंना यावेळी आवश्यक आरोग्य सल्लाही देण्यात आला.

.      आदिवासी बांधवांनी सादर केलेल्या पारंपरिक नृत्य आणि गीतांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या कलाविष्कारातून आदिवासी समाजाच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या बलिदानाचा इतिहास मांडला आणि आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकजूट होण्याचे आवाहन केले.

.      प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या सोहळ्यात वीर बाबुराव शेडमाके स्मारक समितीच्या अध्यक्षा शशिकला उईके, विलास मसराम, आदिवासी सेवक डी. के. आरिकर, अखिल भारतीय आदिवासी संघटनेचे अध्यक्ष कृष्णा मसराम, जनार्दन गोडाम, भारत आत्राम, प्रेमदास मेश्राम, विजय कुमरे, मधुकर कोटनाके, प्रमोद कोडपे, प्रतीक कुलसंगे आणि शुभम मडावी यांसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व समाजबांधवांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

error: Content is protected !!