१४ मार्चला ‘महाराजस्व’ शिबिराचे आयोजन
जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम
१२ ते १४ मार्च दरम्यान नागरिकांना घेता येणार योजनांचा लाभ
चंद्रपूर : राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांना या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आनंदवन, वरोरा येथील मुख्यमंत्री सभागृहात तीन दिवसीय शासकीय योजनांचे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी (दि. १२) वरोराचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के यांच्या हस्ते फित कापून उत्साहात करण्यात आले.
. याप्रसंगी वरोराचे उपविभागीय अधिकारी संदीप भस्के, वरोराचे तहसीलदार योगेश कौटकर, आनंदवनच्या विश्वस्त पल्लवी आमटे, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, आनंदवनचे जनसंपर्क अधिकारी राजेश ताजणे, वाचा उपचार तज्ज्ञ रविकांत घोलप यांच्यासह विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]()
शासकीय योजनांचा जागर
उद्घाटनपर भाषणात उपविभागीय अधिकारी संदीप भस्के म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून हे प्रदर्शन भरवण्यात आले असून, १४ मार्च रोजी याच ठिकाणी ‘महाराजस्व’ शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.” नागरिकांनी या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
आयुष्य घडवणाऱ्या योजना – पल्लवी आमटे
आनंदवनच्या विश्वस्त पल्लवी आमटे यांनी यावेळी आपले विचार मांडले. त्या म्हणाल्या की, “शासनाकडून रोजगार आणि उद्योगाशी संबंधित अनेक उत्तम योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून सरकार मदत करण्यास तयार आहे, त्याचा लाभ घेतल्यास सामान्य माणसाचे आयुष्य उभे राहू शकते. आनंदवन अशा विधायक उपक्रमात नेहमीच सहभागी राहील.”
वेळ आणि नियोजन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविकांत घोलप यांनी केले, तर आभार जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी मानले. हे प्रदर्शन आनंदवन येथील मुख्यमंत्री सभागृहात १२, १३ आणि १४ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सर्व नागरिकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


