प्रशासकीय क्षेत्रात भरारी घेण्याचे दुर्गा चवरे यांचे आवाहन
सावित्रीबाई फुले यांना आदरांजली
विद्यार्थिनींनी प्रशासकीय आणि तांत्रिक क्षेत्रात ठसा उमटवण्याचे मान्यवरांचे प्रतिपादन
चंद्रपूर : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज, वडगाव (चंद्रपूर) येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र आदरांजली अर्पण करण्यात आली.
. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक दुर्गा चवरे उपस्थित होत्या. आपल्या प्रेरणादायी भाषणातून त्यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. “आजच्या युगात इंजिनीअरिंग आणि प्रशासन ही दोन्ही क्षेत्रे एकमेकांना पूरक आहेत. मुलींनी स्वतःला केवळ पदवीपुरते मर्यादित न ठेवता स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून समाजाची सेवा करावी,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
. व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक पी.एस. आंबटकर, उपाध्यक्ष पियुष आंबटकर, सचिव प्रीती आंबटकर, डायरेक्टर अंकिता आंबटकर, प्रा. डॉ. हजारे आणि विभाग प्रमुख डॉ. उज्ज्वला सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली.
. डॉ. उज्ज्वला सावरकर यांनी महिलांच्या मानसिक स्वास्थ्यावर आणि शिक्षणातील जिद्दीवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे नेटके संचालन महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी केले, तर आभार प्रदर्शन श्रुतिका तुरणकर हिने केले. या सोहळ्याला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


