उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरा
बल्लारपूर तालुक्यात ‘शासन आपल्या दारी‘ उपक्रमाची अंमलबजावणी
विसापूर येथे समाधान शिबिराचा शुभारंभ
बल्लारपूर : शासनाच्या महसूल विभागांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत लोकाभिमुख उपक्रम राबविले जात आहे. यासाठी बल्लारपूर तालुक्यात कोठारी व बल्लारपूर मंडळात कालबद्ध कार्यक्रम सुरु करण्यात आले आहे.महाराजस्व अभियान लोककल्याणासाठी हितकारक असून जनतेनी याचा लाभ घ्यावा, असे प्रतिपादन बल्लारपूर येथील उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरा यांनी विसापूर गुरूवार (दि. ५) रोजी नागरिकांशी संवाद साधताना केले.
![]()
. बल्लारपूर उपविभागीय व तहसील कार्यालयाच्या वतीने विसापूर येथील ग्रामपंचायत सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर टप्पा एक अंतर्गत ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी अर्जुन पावरा होते, तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार रेणुका कोकाटे, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, नायब तहसिलदार महेंद्र फुलझेले,विसापूरच्या सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, मंडळ अधिकारी किशोर नवले, सुजीत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य शारदा डाहुले, विद्या देवाळकर, प्रदीप गेडाम, तलाठी आरती दुलत यांची उपस्थिती होती.
. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर अभियानांतर्गत शासन आपल्या दारीच्या माध्यमातून महसूल विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणीसाठी संवाद यात्रा, नागरिकांच्या तक्रारीचे एकाच ठिकाणी निवारण करणे,डिजिटल सेवा वापरून सातबारा व आठ अ उतारे अद्यावत करुन जिवंत करणे,प्रलंबित फेरफार निकाली काढणे,लोकसेवा हक्क दाखले अंतर्गत उत्पन्न, रहिवासी, जात व नानक्रीमीलेयर प्रमाणपत्र तयार करून देण्यासोबत एकाच ठिकाणी अर्ज स्विकारुन तात्काळ सेवा देण्याचा संकल्प महसूल प्रशासनाने हाती घेतला असल्याची माहिती तहसीलदार रेणुका कोकाटे यांनी दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसिलदार महेंद्र फुलझेले यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांची व नागरिकांची उपस्थिती होती.
बल्लारपूर तालुक्यातील कालबद्ध कार्यक्रम
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी गाव संवाद यात्रेचे नियोजन तहसीलदार मार्फत करण्यात आले आहे. बल्लारपूर मंडळातील नांदगाव ( पोडे ) व बामणी ( दुधोली ) ग्रामपंचायत मध्ये दिनांक ६ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते ११ वाजता शिबीर घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कोठारी मंडळात पळसगाव, कोठारी, कळमना व कवडजई येथे संवाद शिबीर घेण्यात आले. ७ मार्चला कोठारी मंडळात समाधान शिबीर होणार असून १४ मार्चला विसापूर येथील शिबीरात विसापूर, नांदगाव ( पोडे ) व बामणी ( दुधोली ) नागरिकांसाठी समाधान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.


