नंदोरी येथे पूर्व नियोजन आढावा बैठक संपन्न
तहसीलदारांच्या ‘ॲक्शन मोड’मुळे ग्रामस्थांचे समाधान
भद्रावती : तालुक्यात नागरिकांच्या शासकीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा क्र. १)’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा भव्य शुभारंभ शनिवार, ७ मार्च रोजी नंदोरी येथील वरिष्ठ हनुमान मंदिर देवस्थान येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज, गुरुवारी ५ मार्च रोजी ग्रामपंचायत नंदोरी येथे भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या अध्यक्षतेखाली पूर्व तयारी नियोजन आढावा बैठक उत्साहात पार पडली.
. या बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी महसूल आणि इतर विभागांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न मांडले. तहसीलदार भांडारकर यांनी केवळ उत्तरे देऊन न थांबता, जे अधिकारी बैठकीला उपस्थित नव्हते, त्यांना थेट मोबाईलवरून संपर्क साधला. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत त्यांनी उपस्थित ग्रामस्थांच्या तक्रारींचे जागेवरच समाधान केले. त्यांच्या या ‘ॲक्शन मोड’मुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
. या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून नंदोरी ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा माजी सरपंच मंगेश भोयर, शेतकरी उत्पादक कंपनीचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जिवतोडे, माजी उपसरपंच भानुदास ढवस, माजी सदस्य किशोर उमरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रमेश तिखट, माजी सरपंच शरद खामणकर, माजी सभापती धनराज विरुटकर, सामाजिक कार्यकर्ते जयंत एकरे, स्वप्नील लांबट, नंदोरीचे तलाठी लोंढे, टाकळीचे तलाठी डोंगरे यांसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
तहसीलदार राजेश भांडारकर यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, “या शिबिराचा मुख्य उद्देश एकाच छताखाली नागरिकांना सर्व शासकीय सेवा आणि दाखले उपलब्ध करून देणे हा आहे.” त्यांनी या अभियानांतर्गत होणाऱ्या कामकाजाची सविस्तर माहिती देऊन जास्तीत जास्त नागरिकांनी ७ मार्च रोजी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
. कार्यक्रमाचे संचालन मंडळ अधिकारी वाटेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन तलाठी लोंढे यांनी मानले.


