युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे दिमाखदार आयोजन
विविध स्पर्धा आणि रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद
चंद्रपूर : “हातात तलवार, कपाळावर चंद्रकोर आणि चेहऱ्यावर स्वराज्याचं लखलखतं तेज… भद्रावती तालुक्यातील नंदोरी नगरीत जेव्हा बालशिवाजी आणि राजमाता जिजाऊंच्या वेशभूषेत चिमुकली मुले अवतरली, तेव्हा उपस्थितांना थेट शिवशाहीच्या सुवर्णकाळाची प्रचिती आली.” युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सवाचे हे सर्वात मोठे आकर्षण ठरले. १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान पार पडलेल्या या तीन दिवसीय महोत्सवाने संपूर्ण नंदोरी नगरी चैतन्याने न्हाऊन निघाली होती.
विविध उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी
उत्सवाच्या शेवटच्या दिवशी, १९ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता स्वच्छता अभियानाने दिवसाची सुरुवात झाली. दुपारी १२ वाजता आयोजित रांगोळी स्पर्धेत स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सामाजिक भान जपण्यासाठी दुपारी २ ते ५ या वेळेत रक्तदान शिबिर घेण्यात आले, ज्यात अनेक तरुणांनी रक्तदान केले. सायंकाळी ७ वाजता गावातून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने आणि भगव्या ध्वजांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
दिमाखदार बक्षीस वितरण सोहळा
रात्री ८ वाजता शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर बक्षीस वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला शेतकरी उत्पादक महासंघाचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, माजी सभापती प्रविण ठेंगणे, माजी सरपंच मंगेश भोयर, किशोर उमरे, शरद खामणकर, घनश्याम ढवस, रमेश तिखट, पांडुरंग लांबट, युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भानुदास ढवस, विनोद लांबट आणि स्वप्नील लांबट आदी मान्यवर उपस्थित होते.
विजेत्यांनी गाजवले व्यासपीठ
या महोत्सवांतर्गत आयोजित विविध स्पर्धांमध्ये चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांनी उपस्थितांची मने जिंकली. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या भाषण स्पर्धेत आनंदी लोहकरे हिने प्रथम, तर स्वरा अवगान हिने द्वितीय क्रमांक पटकावला. एकल नृत्य स्पर्धेत मानवी जुनघरे हिने प्रथम, गारव्ही डोंगे हिने द्वितीय आणि आराध्य तिखट हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच, सामूहिक नृत्य जिजाऊ ग्रुप, मावळे ग्रुप आणि साई कॉनव्हेंटच्या संघांनी आपल्या बहारदार सादरीकरणाने यशाचे शिखर गाठले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यकर्त्यांचे परिश्रम
कार्यक्रमाचे संचालन विनोद लांबट यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष भानुदास ढवस, स्वप्नील लांबट, अजित पुसनाके, प्रणय ढवस, अंकित पुसनाके, निखिल शिवरकर, साहिल ढवस, स्वप्नील बुरटकर, निखिल ढवस, प्रज्वल एकरे, सन्नी ढवस व त्यांच्या सहकाऱ्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. कीर्तन, पालखी सोहळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या या मेजवानीमुळे नंदोरीसह परिसरातील अबालवृद्ध आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून हा सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरवला.


