Home सामाजिक वरोरा येथे २२ फेब्रुवारीला ‘विधी सेवा महाशिबीर’ आणि ‘शासकीय योजनांचा महामेळावा’

वरोरा येथे २२ फेब्रुवारीला ‘विधी सेवा महाशिबीर’ आणि ‘शासकीय योजनांचा महामेळावा’

297

प्रशासनातर्फे जय्यत तयारी

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी घेतला आढावा

आरोग्य तपासणीसह शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार २२ फेब्रुवारी २०२६ रोजी वरोरा येथे ‘विधी सेवा महाशिबीर’ आणि ‘शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा विधीसेवा प्राधिकरण चंद्रपूर, वरोरा तालुका विधीसेवा प्राधिकरण आणि चंद्रपूर जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जाणार आहे.

.      या नियोजित मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी आढावा बैठक पार पडली. यावेळी मुख्य न्याय दंडाधिकारी पी.पी. कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

.     यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी गौडा म्हणाले की, वरोरा येथे होणाऱ्या या महामेळाव्यात सर्व शासकीय विभागांनी आपले स्टॉल्स लावून नागरिकांमध्ये योजनांविषयी जनजागृती करावी. या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना थेट लाभ मिळवून देणे आणि त्यांना शासकीय प्रक्रियेची माहिती देणे हा मुख्य उद्देश आहे.

मेळाव्याचे ठिकाण व वेळ : हा महामेळावा २२ फेब्रुवारी रोजी स्व. दादासाहेब देवतळे शेतकरी भवन, सद्भवना चौक, अभ्यंकर वॉर्ड (चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मागे), वरोरा येथे सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.

प्रमुख आकर्षणे : विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याची सुविधा, मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिर, विधी सेवा आणि कायदेशीर मार्गदर्शनाचे स्टॉल्स.

.        प्रशासनातर्फे आयोजित या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी वरोरा तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

error: Content is protected !!