सा. बां. उपविभाग सिंदेवाहीने देखभाल दुरुस्तीकडे फिरविली पाठ
सिंदेवाही
. ग्रामीण भागाचा विकास व्हावा, त्यांची शहराशी नाळ जुळली जावी, म्हणून शासनाकडून अनेक योजनांमधून रस्त्यांची निर्मिती केली जाते. मात्र त्या रस्त्यांची योग्य देखभाल दुरुस्ती केली जात नाही. परिणामी अनेक रस्ते धोकादायक झाले असल्याने नेहमी अपघात होऊन जखमी होण्याचे प्रमाण सध्या सिंदेवाही तालुक्यात वाढत असल्याचे दिसून येत आहे.
. सिंदेवाही हे तालुक्याचे ठिकाण असून सर्व शासकीय कार्यालये, दवाखाने, शाळा महाविद्यालये, आणि बाजारपेठ येथे असल्याने ग्रामीण भागातील नागरिक आणि कामगार वर्ग दररोज सिंदेवाही या ठिकाणी येत असतो.
. सिंदेवाही शहरातून बाहेर निघणारे सर्व रस्त्याच्या बाजूला झाडे झुडपे वाढलेले आहेत. त्यामुळे वळण मार्गावर पलीकडील वाहने दिसत नसल्याने अचानक वाहन जवळ आल्यावर वाहन चालक घाबरून एकमेकांना आदळत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम उपविभाग सिंदेवाही अंतर्गत येत असलेल्या सिंदेवाही-वासेरा या मार्गावरील रस्त्यांच्या कडेला अनेक झाडे झुडपे वाढलेली आहेत. वळण मार्गावर जास्तच झुडपे वाढली असल्याने समोरून येणारे वाहन दिसत नाही. सिंदेवाही पासून शहराच्या बाहेर निघाल्यावर ठाकरे यांचे शेताजवळ हनुमान मंदिर आहे. त्याजवळील वळण मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. तसेच रामाळा गावा जवळ असलेल्या नदीच्या पूर्वी वळण मार्ग असून त्याठिकाणी झुडूपांचा वेढा रस्त्याच्या कडेला आलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा अनेकवेळा किरकोळ अपघात झाले आहेत. नवरगाव मार्गावरील लाडबोरी जवळ अनेक वळण मार्गावर झुडपे वाढलेली आहेत.
. मात्र सार्वजानिक बांधकाम उपविभागातील अधिकारी, कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असून देखभाल दुरुस्ती कडे मुद्धाम पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात जाणारे रस्ते अगोदरच अरुंद आहेत. आणि त्यामध्ये रस्त्याच्या कडेला वाढलेले झाडे झुडपे यामुळे वळण मार्गावर अपघात होण्याचे प्रमाण जास्तच वाढले आहे. त्यामुळे सिंदेवाही येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयांनी याकडे त्वरित लक्ष घालून रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या झुडूपांची साफ सफाई करावी. अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

