वरोरा : लोक शिक्षण संस्था द्वारा संचालित येथील लोकमान्य महाविद्यालय, वरोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने १२ जानेवारी २०२६ रोजी स्वामी विवेकानंद जयंती (युवा दिन) आणि राष्ट्रमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी एका नाविन्यपूर्ण ‘रील’ (Reel) स्पर्धेचे आयोजन केले होते.
. या स्पर्धेचा मुख्य विषय ‘प्रेरणा देणाऱ्या कोणत्याही एका व्यक्तीचे व्यक्तिमत्व’ असा होता. विद्यार्थ्यांमध्ये स्वामी विवेकानंदांचे विचार आणि राष्ट्रमाता जिजाऊंचे संस्कार रुजावेत, तसेच त्यांच्यात शौर्य, देशभक्ती आणि त्यागाची भावना निर्माण व्हावी, हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश होता. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मीडियाच्या माध्यमातून इतिहासातील शूरवीरांच्या बलिदानाची आणि विविध क्षेत्रातील पराक्रमाची ओळख तरुण पिढीला करून देणे, हा या कार्यक्रमाचा व्यापक हेतू होता.
. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री होत्या. त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेले संस्कार आणि स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी चरित्र यावर प्रकाश टाकला. या प्रसंगी स्पर्धेतील निवडक रील सर्व स्वयंसेवकांना दाखवून त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे सहकार्यक्रम अधिकारी डॉ. श्रीकांत पुरी यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन प्रगती हजारे यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.


