विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक जागृतीचा जागर
चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण
‘बालवीर’ पुरस्कार प्राप्त शिवम कुळसंगेचा विशेष सत्कार
भद्रावती : विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक हक्कांप्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी स्थानिक यशवंतराव शिंदे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तहसील कार्यालय भद्रावती व ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मान्यवरांची उपस्थिती या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार भद्रावती बालाजी कदम, तालुका कृषी अधिकारी कार्यालय भद्रावतीचे तालुका गुण नियंत्रण अधिकारी अरविंद भरडे, पंचायत समिती भद्रावतीचे सहाय्यक गटविकास अधिकारी बंडू आकनुरवार, महावितरण भद्रावती उपविभागाच्या मुख्य तंत्रज्ञ कोमल सहारे, ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष परशुराम तुंडूलवार, जिल्हा उपाध्यक्ष अरुण जमदाडे, जिल्हा कार्याध्यक्ष दिपक जोगी, जिल्हा सल्लागार सुनील पाचखेडे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा भद्रावतीचे अध्यक्ष प्रवीण चिमुरकर, सचिव वतन लोणे प्रामुख्याने उपस्थित होते
चित्रकला स्पर्धेचा निकाल राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रथम क्रमांक निधी करमरकर (सेंट अॅन्स स्कूल, भद्रावती), द्वितीय क्रमांक दुर्गा बोरकुटे (यशवंतराव शिंदे विद्यालय), तृतीय क्रमांक उमर हनफी, सांत्वनापर पुरस्कार: तिथी मोघे या विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
बालवीर पुरस्काराचा मानकरी या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे यशवंतराव शिंदे विद्यालयातील इयत्ता ८ वीचा विद्यार्थी शिवम कुळसंगे हा ठरला. शिवमला ‘बालवीर पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांचा गौरव विद्यार्थ्यांमध्ये ग्राहक संरक्षण कायद्याविषयी ओढ निर्माण व्हावी, यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ‘जागो ग्राहक जागो’ या मोहिमेचे महत्त्व विशद केले.
यशस्वितेसाठी परिश्रम हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा भद्रावतीचे उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार, कोषाध्यक्ष भारत खोब्रागडे, सहसचिव करुणा मोघे, संघटक सोनल वावरे, सदस्य गुरुदेव बावणे, विनोद ठमके, प्रतिक्षा बनकर, प्रकाश पिंपळकर तसेच तहसील कार्यालयाचे कनिष्ठ लिपीक रती मस्के आणि आतिश मजगवळी यांनी विशेष परिश्रम घेतले.
. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभाग निरीक्षण अधिकारी हर्षा दुधे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रवीण चिमुरकर यांनी मानले. या कार्यक्रमाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.


