२८ वर्षांनंतर मित्रांनी लावून दिला पुनर्विवाह
सुधीर पारधी
भद्रावती : मैत्री हे जगातील असे एकमेव नाते आहे जे काळाच्या ओघात अधिक गडद होत जाते. मैत्री जेव्हा आपल्या दोन मित्रांच्या आयुष्यातील आनंदाचा सोहळा पुन्हा साजरा करण्याचे ठरवते, तेव्हा तो क्षण समाजासमोर एक आदर्श उभा करतो. भद्रावती येथील लोकविद्यालयाच्या १९८७ बॅचच्या वर्गमित्रांनी नुकताच असाच एक अनोखा उपक्रम राबवून मैत्रीचा नवा अध्याय लिहिला.
प्रेमकथा आणि संघर्षाचा प्रवास ही गोष्ट आहे हेमलता पाटील आणि संजय बॅनर्जी यांची. शाळेच्या कट्ट्यावर सुरू झालेली त्यांची प्रेमकथा २८ वर्षांपूर्वी विवाहाच्या बेडीत अडकली. त्याकाळी प्रेमविवाह करणे आजच्यासारखे सोपे नव्हते. अनेक कौटुंबिक आणि सामाजिक अडचणींना सामोरे जात त्यांनी आपला संसार थाटला. गेल्या २८ वर्षांत त्यांनी संसाराचे अनेक चढ-उतार पाहिले, मुलांचे संगोपन केले आणि सर्व जबाबदाऱ्या खंबीरपणे पार पाडल्या.
मित्रांचा अनोखा पुढाकार या विवाह सोहळ्याचे खरे सूत्रधार ठरले त्यांचे जुने वर्गमित्र. सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेल्या १९८७ च्या बॅचमधील मित्रांनी आपल्या ग्रुपमधील या जोडप्याच्या लग्नाला २८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काहीतरी हटके करण्याचे ठरवले. केवळ मेजवानी किंवा पार्टी न देता, त्यांनी या जोडप्याचे पुन्हा एकदा रीतसर लग्न लावण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
राजमनी लॉनवर रंगला सोहळा दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी भद्रावती येथील राजमनी लॉन येथे हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. हा केवळ गंमत म्हणून केलेला सोहळा नव्हता, तर हेमलता आणि संजय यांनी आजवर एकमेकांना दिलेल्या खंबीर साथीची ती एक पोचपावती होती.
या मित्रांची होती उपस्थिती या सोहळ्यासाठी अनिल धानोरकर, राजेश बदखल, श्रीकांत अस्वले, घनश्याम पिंपळकर, शशिकांत कवाडे, किशोर सावलीकर, प्रशांत बाकरे, संजय उंमरे, संजय आसेकर, मुनेश्वर तेलंग, विकास बाकरे, विलास माथनकर, विकास आसुटकर, किशोर सहारे, दीपा रायपुरे, रत्नमाला मोकाशी यांसह इतर सर्व वर्गमित्रांनी उत्साहाने सहभाग घेतला.


