रक्तदान आणि आरोग्य शिबिरातून जपली सामाजिक बांधिलकी
७१ जणांचे रक्तदान, २९० नागरिकांची आरोग्य तपासणी
थोरल्या भावाच्या स्मृती जतन करण्यासाठी जवान निलेश निकुरे यांची उपस्थिती
वरोरा : देशसेवा बजावताना वीरमरण आलेल्या वरोरा तालुक्यातील पिंपळगाव येथील सुपुत्र शहीद नाईक अक्षय निकुरे यांचा प्रथम स्मृती पुण्यस्मरण सोहळा नुकताच अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. पिंपळगाव येथील ‘शहीद स्मृती वन’ या ठिकाणी आयोजित या कार्यक्रमातून अक्षय यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. विशेष म्हणजे, आपल्या थोरल्या भावाच्या स्मृती जतन करण्यासाठी स्वतः जवान निलेश निकुरे या सोहळ्याला उपस्थित होते.
. गेल्या वर्षी पुंच जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये हेडक्वार्टरवरून कंपनी लोकेशनकडे जात असताना जवानांचे वाहन ३५० फूट खोल दरीत कोसळले होते. या भीषण अपघातात अक्षय निकुरे यांना वीरमरण आले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली होती.
. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक संघटना, शहीद योगेश डाहूले यांचे आई-वडील, टेंमुर्डा येथील सरपंच सुचिता ठाकरे आणि पोलीस पाटील शोभा चंदनबटवे उपस्थित होत्या. व्याख्याते म्हणून साहित्यिक व कथा लेखक प्रा. प्रभाकर लोंढे यांनी जवानांच्या शौर्यावर प्रकाश टाकला.
. यावेळी आनंदवन येथील एनसीसी कॅडेट्सनी मानवंदना दिली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव, सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय आणि संत तुकडोजी विद्यालय टेंमुर्डा येथील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहीद अक्षय निकुरे यांच्या बलिदानाची प्रेरणा भावी पिढीला मिळावी, हाच या सोहळ्याचा मुख्य उद्देश होता.
७१ दात्यांनी केले रक्तदान केवळ औपचारिकता न पाळता, शहीद अक्षय यांच्या स्मृती प्रीत्यर्थ सामाजिक कार्याचा डोंगर उभा करण्यात आला. ‘अमन ब्लड बँक, नागपूर’ यांच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात ७१ दात्यांनी रक्तदान केले. तसेच सावंगी येथील ‘शालिनी हॉस्पिटल’ द्वारे आयोजित मोफत आरोग्य शिबिरात २९० नागरिकांनी तपासणी करून घेतली. यापैकी ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे, त्यांना पुढील उपचारांसाठी नागपूर येथे नेण्यात येणार आहे.


