Home सामाजिक पांझुर्णी येथे माढेळी व पांझुर्णी केंद्राची विशेष शिक्षण परिषद संपन्न

पांझुर्णी येथे माढेळी व पांझुर्णी केंद्राची विशेष शिक्षण परिषद संपन्न

480

सकारात्मक शिस्त या संकल्पनेवर शिक्षकांचे मार्गदर्शन व सखोल चर्चा

वरोरा : सकारात्मक शिस्त ही शिक्षणपद्धती मुलांना शिक्षा न करता समज, संवाद, प्रेम व योग्य मार्गदर्शनाच्या माध्यमातून शिस्त लावण्यावर भर देते. मुलांच्या भावना, गरजा व क्षमतांचा आदर राखत त्यांना घडविणे हीच या संकल्पनेची मध्यवर्ती भूमिका असून, याच विचारधारेतून माढेळी व पांझुर्णी केंद्राची चौथी विशेष शिक्षण परिषद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, पांझुर्णी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

.       या परिषदेच्या अध्यक्षस्थानी बीट प्रमुख अशोक राऊत होते. तज्ज्ञ मार्गदर्शक व सुलभक म्हणून अमृत गेडाम, प्रफुल्ल ढेंगेकर, सुनिल कार्लेकर व सुयोग पाटील यांनी मार्गदर्शन केले. ही परिषद उपस्थित शिक्षकांसाठी प्रेरणादायी व दिशादर्शक ठरली.

.        कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदर्श परिपाठाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. स्वागत गीताने वातावरण प्रसन्न झाले. पुष्पगुच्छ देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

.        सकारात्मक शिस्त या विषयावर अमृत गेडाम (मुख्याध्यापक, शाळा पांझुर्णी) यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. दरम्यान यश काथवटे (मूल्यवर्धन समन्वयक) यांनी शाळांमध्ये मूल्यवर्धन उपक्रम राबविण्याबाबत माहिती दिली.
दुपारच्या सत्रात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान, निपुण महाराष्ट्र अभियान, मासिक चाचण्या, देशभक्तीपर कवायत व संचलन, माजी विद्यार्थी स्नेहमेळावा, विद्यार्थी सुरक्षा अंमलबजावणी, ऑनलाईन विद्यार्थी उपस्थिती, आनंददायी शनिवार – चित्रपटाच्या माध्यमातून पायाभूत अध्ययन, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, शिष्यवृत्ती परीक्षा सराव व मार्गदर्शन, परीक्षेवर संवाद, आपले संविधान – आपली जबाबदारी, युडायस प्लस माहिती, डॉ. जयंत नारळीकर गणित-विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम, नवरत्न स्पर्धा, शालेय बालक्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा, प्रशस्त अ‍ॅप आदी विषयांवर सविस्तर चर्चा करून पुढील नियोजन करण्यात आले.

.     यावेळी विनोबा अ‍ॅप मधील महिन्यातील उत्कृष्ट पोस्ट विजेत्या शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. माढेळी व पांझुर्णी केंद्रातील शिक्षकांच्या उपस्थितीत ही चौथी शिक्षण परिषद यशस्वीरीत्या पार पडली. कार्यक्रमाच्या शेवटी राजेंद्र लोखंडे यांनी आभार प्रदर्शन केले. वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

error: Content is protected !!