खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पाठपुराव्यामुळे अतिवृष्टीची नुकसानभरपाई
चंद्रपूर : जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आणि भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्र आणि राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. याच प्रयत्नांचा भाग म्हणून, हिवाळी अधिवेशनात लोकसभेत (तारांकित प्रश्न क्र. ३३) त्यांनी हा गंभीर मुद्दा अत्यंत प्रभावीपणे मांडला. त्यांच्या या निर्णायक ‘आवाजा’ला मोठे यश मिळाले असून, केंद्र सरकारने दिलेल्या लेखी उत्तरात चंद्रपूर जिल्ह्यासाठी तब्बल ९३.७६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे. या महत्त्वपूर्ण मागणीमुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या हजारो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सरकारला अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारून मदतीचा तपशील मागितला होता. त्यांनी विशेषत्वाने सोयाबीन व्यतिरिक्त इतर पिकांचे झालेले गंभीर नुकसान, यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांची नेमकी संख्या आणि त्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून लवकरात लवकर पुरेसे आर्थिक साहाय्य उपलब्ध करण्यासाठी सरकारने उचललेली पाऊले यावर जोर दिला. याव्यतिरिक्त, पंचनामा करताना मृदा अपरदन आणि संपूर्ण पीक हानी यांसारख्या घटकांचा समावेश केला जात नसल्याच्या तक्रारींकडेही त्यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले होते.
. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रश्नांना लेखी उत्तर देताना केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने चंद्रपूर जिल्ह्यासाठीची मदत स्पष्ट केली आहे. यात अतिवृष्टीमुळे बाधित सर्व पिकांसाठी जिल्ह्याला ९,३७६.५६ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, रब्बी पिकांसाठी सर्व बाधित शेतकऱ्यांकरिता ११,०३०.९४ लाख रुपयांची अतिरिक्त विशेष सहायता देखील जारी करण्यात आली आहे. मदत वितरणाच्या सद्यस्थितीबद्दल सांगायचे झाल्यास, २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत ‘ई-पंचनामा पेमेंट वितरण पोर्टल’च्या माध्यमातून १,१३,४५५ बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ८२,३७,५०,०४८ रुपयांची रक्कम हस्तांतरित झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्वरित दिलासा मिळाला आहे.
. आपत्ती व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारांची असली तरी, केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत आवश्यक ती मदत पुरवली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२०२६ साठी मंजूर झालेल्या निधीपैकी केंद्राच्या हिश्श्याचे १५६६.४० कोटी रुपये राज्याला वर्ग करण्यात आले आहेत. पूरस्थितीच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आंतर-मंत्रालयी केंद्रीय पथकाने ३ ते ५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत बाधित क्षेत्रांचा दौरा केला होता. पंचनामा प्रणालीबाबतच्या तक्रारींवर, महाराष्ट्र सरकारने अशी कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे केंद्राला कळवले आहे. एकंदरीत, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतकऱ्यांची बाजू लावून धरल्यामुळेच चंद्रपूरच्या शेतकऱ्यांना हा महत्त्वपूर्ण आणि त्वरित आर्थिक लाभ मिळाला आहे.


