राजकारण म्हणजे केवळ निवडणूक जिंकणे, सत्ता मिळवणे नाही. ते दीर्घकाळ टिकवायचे असेल तर त्याला समाजकारणाची जोड द्यावी लागते. केवळ विकास एवढाच अर्थ यात अभिप्रेत नाही.
. राजकारण म्हणजे केवळ निवडणूक जिंकणे, सत्ता मिळवणे नाही. ते दीर्घकाळ टिकवायचे असेल तर त्याला समाजकारणाची जोड द्यावी लागते. केवळ विकास एवढाच अर्थ यात अभिप्रेत नाही. समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचणे, त्यांना स्वत:शी जोडणे व हे नाते दीर्घकाळ टिकेल अशी व्यवस्था उभी करणे हाही राजकारणाचा एक भाग असतो. तो ज्यांना कळला त्याचे राजकारण यशस्वी होते. या क्षेत्रात असलेल्या प्रत्येक नेत्यालाच हे साध्य होते असेही नाही. मात्र, ज्यांना होते अशी नावे बोटावर मोजण्याएवढी. हे सारे विस्ताराने सांगण्याचे कारणही तसेच. उद्योगांमुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या चंद्रपूर शहरात एक सुसज्ज कर्करोग रुग्णालय सुरू होतेय. याचे जनक भाजप नेते सुधीर मुनगंटीवार. टाटा ट्रस्ट, खनिज विकास प्रतिष्ठान व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प येत्या डिसेंबरमध्ये सुरू होतोय. २८० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयाचे व्यवस्थापन असणार ते जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील कंपनीकडे. त्यामुळे रुग्णांची लुबाडणूक, प्रशासकीय अनागोंदी याला स्थान असण्याची शक्यता शून्य. विकास नावाची संकल्पना कशी राबवायची याचे हे उत्तम उदाहरण. महागड्या आरोग्यसेवेमुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आले असतानाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा देणारे.
. तर मुद्दा असा की हे जे भाजपनेत्यांना जमते ते काँग्रेसच्या नेत्यांना आजवर का जमले नाही? केवळ मुनगंटीवारच नाही तर नागपुरात देवेंद्र फडणवीसांनी असेच एक सुसज्ज रुग्णालय उभारले. त्यांचेच समर्थक आमदार संदीप जोशी यांनी फडणवीसांच्या वडिलांच्या नावाने स्वस्त दरात वैद्यकीय सुविधा देणारे एक केंद्र नुकतेच सुरू केले. दुसरीकडे गडकरींनी सुद्धा उत्तर नागपुरात काही दिवसाआधीच असेच केंद्र सुरू केले. निवडणुकीचे निकाल काहीही लागोत पण सामान्यांना या माध्यमातून जोडून ठेवण्याची ही कल्पना भाजपनेत्यांना सुचते याचे एकमेव कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्या साऱ्यांना सेवेची शिकवण मिळाली ती यातून. यातल्या गडकरी व फडणवीसांना असे प्रकल्प उभारण्यासाठी उद्योगांचा दायित्व निधी मिळवणे सोपे होते. मुनगंटीवारांनी रतन टाटांकडून शब्द घेतानाच त्यात खनिज विकास प्रतिष्ठानला जोडले. जिथे खाणी तिथे हा निधी भरपूर. पण त्यातून केवळ रस्ते, इमारती उभारण्यावर साऱ्यांचा भर. याही निधीतून दीर्घकाळ टिकू शकेल असे काम उभारता येऊ शकते हे मुनगंटीवारांनी दाखवून दिले. एकदा सत्ता मिळाल्यावर भाजपचा पराभव करणे कठीण का जाते याचे उत्तर या अशा सेवाकारणात दडलेले. गेल्या दहा वर्षात भाजपने असे एकही क्षेत्र शिल्लक ठेवले नसेल जिथे त्यांचा शिरकाव झालेला नसेल. समाजाच्या सर्व घटकात कामाच्या माध्यमातून शिरण्याची ही कला इतकी वर्षे सत्तेत असूनही काँग्रेसला का साध्य करता आली नसेल? जेव्हा हा पक्ष सत्तेत होता तेव्हा समाजकारण सुद्धा सरकारच्या तिजोरीतून करण्याची सवय नेत्यांना लागली होती. यातून वैद्यकीय महाविद्यालये उभी राहिली. यातली बरीचशी नेत्यांनी स्वत:च्या संस्थेच्या पदरात पाडून घेतली. शिक्षणक्षेत्राच्या खाजगीकरणाचा सर्वाधिक फायदा काँग्रेसच्या नेत्यांनी उचलला. यातून शिक्षणाची सोय झाली पण हे नेतेही धनवान झाल्याचे समाजाला नंतर कळू लागले. शिक्षणाचा फायदा राहिला बाजूलाच पण यातून या नेत्यांची बदनामी तेवढी झाली. यामुळे सावध झालेल्या भाजपनेत्यांनी या महागड्या शिक्षणसेवेचा मार्ग कधीच धरला नाही. सत्ता आली व ती दीर्घकाळ टिकली की नेते वेगाने श्रीमंत होतात. याला कुणीही अपवाद नाही. मग ते भाजपचे नेते असोत वा काँग्रेसचे. ही अशी श्रीमंती झाकून ठेवायची असेल तर समाजकारणाच्या माध्यमातून संस्थात्मक कामांची उभारणी करावी लागते. ही चतुराई भाजपच्या नेत्यांना दाखवता आली, काँग्रेसच्या नाही. सामान्य लोकांना केवळ सेवा हवी असते. नेते त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात काय करतात याच्याशी त्यांना घेणेदेणे नसते. या सूत्राचा काँग्रेसला खुबीने वापरच करता आला नाही. त्यामुळे नेते श्रीमंत व पक्ष गरीब अशी सध्या काँग्रेसची अवस्था झालेली. स्वार्थ साधताना परमार्थाचा विचार आधी करावा लागतो याचा विसर या पक्षाला लवकर पडला. आज जी काँग्रेसची दयनीय अवस्था झाली ती यामुळे.
. सामान्य लोकांमध्ये रोष आहे, भाजपकडून निवडणुका मॅनेज केल्या जातात हे आरोपाच्या पातळीवर ठीक. सध्या काँग्रेसकडून हेच केले जातेय. मात्र भाजप समाजातल्या प्रत्येक घटकाला आपल्याशी जोडून घेण्यासाठी जे नवनवे प्रयोग राबवून यश मिळवतो, याकडे दुर्लक्ष करून कसे चालणार ? आता चंद्रपूरच्या रुग्णालयाचे उद्घाटन होत आहे हे लक्षात आल्यावर तिथल्या काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकरांनी एक मागणी केली. त्याला रतन टाटांचे नाव द्या अशी. हा पश्चात बुद्धीचा उत्तम पुरावा आहे. गेली अनेक वर्षे धानोरकर राजकारणात आहेत. आधी आमदार होत्या. त्या जिथे राहतात त्या वरोरा परिसरात फ्लोराईडयुक्त पाण्याने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले. यातून होणारे आजार जीवघेणे. त्यासाठी पुढाकार घेऊन एखादी संस्था उभारावी, लोकांना उपचाराची सोय उपलब्ध करून द्यावी असे धानोरकरांना का वाटत नसेल? केवळ सरकारवर अवलंबून न राहता स्वत: पुढाकार घेणे हे केव्हाही चांगले पण असे काही काँग्रेसनेत्यांच्या मनात येऊच शकत नाही. तशी शिकवण त्यांना पक्षाकडून कधी मिळाली नाही व त्यांच्या आयुष्याची जडणघडणही त्या पद्धतीने झालेली नाही. भाजप व काँग्रेसच्या नेत्यांमध्ये फरक आहे तो हा. तो सामान्य जनतेच्या लक्षात आलेला पण काँग्रेसच्या नाही.
आजच्या घडीला शेती हे एकमेव क्षेत्र असे उरलेले, जिथे भाजपला अजून जम बसवता आला नाही. संस्थात्मक उभारणी करता आली नाही. हा पक्ष एवढा चतुर की येत्या काळात याही क्षेत्रात तो काम सुरू करेल. याशिवाय भाजपसमोर आणखी एक धोका आहे. या पक्षात जे नवे नेते उदयाला येत आहेत त्यांना या सेवाकार्याचा अजिबात गंध नाही.
. यातले बरेचसे संघाच्या शिकवणीपासून दूर असलेले. यातील बहुतेकांचे सध्याचे वर्तन काँग्रेसच्या नेत्यांसारखेच. कंत्राटे मिळवणे, स्वत:चा विकास साधणे, प्रचाराच्या जोरावर जनतेसाठी खूप काही केले असे भासवणे. लोकांना आकर्षित करता येईल अशी तात्कालिक कामे करून मते मिळवणे यात ते व्यस्त असतात. संस्थात्मक उभारणीचे महत्त्व अजून त्यांना उमगलेले नाही. अर्थात ते पटवून देण्याचे काम संघाचे लोक करत असतातच पण त्याकडे कानाडोळा करण्याकडे त्यांचा कल दिसतो. नेत्यांची ही नवी पिढी अशीच उन्मादी अवस्थेत वावरत राहिली तर भाजपची वाटचाल काँग्रेसच्या दिशेने होण्याचा धोका आहे. तो वेळीच ओळखून त्यावर मात करण्यात भाजप व त्यांच्या पाठीशी असलेला संघपरिवार कमी पडणार नाही. मात्र आहे ते वास्तव असे आहे.


