पालिकेच्या इतिहासात तब्बल १२ वेळा प्रशासकाची राजवट
२६ नगराध्यक्षांपैकी केवळ ४ भाजपाचे झाले
अनेकेश्वर मेश्राम
बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात मोठी नगरपालिका बल्लारपूर आहे. ही नगरपालिका सन १९५२ ला अस्तित्वात आली. तेव्हापासून या नगरपालिकेचा कारभार २६ नगराध्यक्षांनी सांभाळला. यापैकी केवळ ४ नगराध्यक्ष भाजपाचे झाले. येथे प्रशासकीय राजवट १२ अधिकाऱ्यांनी गाजवल्याचा इतिहासात नमुद आहे. आगामी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक साठी सोमवारी नगराध्यक्ष पदाची सोडत जाहीर झाली.आता बल्लारपूर नगरपालिकेच्या अध्यक्ष म्हणून नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलेला संधी मिळाली आहे. यामुळे राजकीय समीकरण जुळविण्यासाठी हालचाल सुरु झाली आहे.
. बल्लारपूर नगरपालिकेच्या इतिहासात आजतागायत २६ नगराध्यक्षांनी कारभार केला आहे. यामध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष कांग्रेसचे झाले आहे. केवळ ४ वेळा भाजपाचे नगराध्यक्ष झाले आहे. विशेष म्हणजे येथील नगरपालिकेत तब्बल १२ अधिकाऱ्यांनी प्रशासकाची जबाबदारी सांभाळली आहे. पहिले नगराध्यक्ष म्हणून पी.एम.टांक यांनी पदभार सांभाळला. त्यांचा कार्यकाळ १९५२ ते १९५५ दरम्यान होता. तर ओबीसी महिला आरक्षण अगोदर भाजपाचे हरिश शर्मा यांनी २८ डिसेंबर २0१६ ते १ जानेवारी २०२२ पर्यंत नगरपालिका सांभाळली. तेव्हापासून आजतागायत नगरपालिकेवर प्रशासकीय राजवट आहे. आता मात्र नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडतीनंतर आगामी सार्वत्रिक निवडणूक होण्याची शक्यता बळावली आहे.
. विशेष म्हणजे बल्लारपूर नगरपालिकेत विशाल वाघ, अमितकुमार, विजय देव ईकर, विजयकुमार सरनाईक, शितल उगले, हेमंतकुमार पवार, एम. बी. गुरलवार, सुधाकर नागूलवार, डी. एम. कापसे, जि. के. देशकर, एम. एच. मोहबे आदी अधिकाऱ्यांनी प्रशासकाची जबाबदारी सांभाळली आहे.
नगरपालिकेत पिता-पुत्र व पती – पत्नी झाले नगराध्यक्ष बल्लारपूर नगरपालिकेत नगराध्यक्ष होण्याचा इतिहास रंजक आहे. विशेष म्हणजे येथील नगराध्यक्ष पदाची धुरा पुंडलिक माकोडे यांनी तब्बल चारदा नगराध्यक्ष होण्याचा मान मिळविला आहे. तर त्यांचा मुलगा दिलीप माकोडे यांनी दोनदा नगराध्यक्ष पद भूषविले आहे. त्याच प्रमाणे येथील नगरपालिकेत घनश्याम मुलचंदानी यांनी 23 डिसेंबर १९९२ ते १४ जुलै १९९४ दरम्यान नगरपालिकेचा कारभार केला आहे. त्यांची पत्नी रजनी घनश्याम मुलचंदानी यांनी येथे २८ डिसेंबर २०११ ते 13 जुलै २०१४ दरम्यान नगरपालिकेच्या अध्यक्ष होत्या. भाजपाचे नगराध्यक्ष म्हणून हरिश शर्मा कनकमकुमार येलय्या,लखनसिंग चंदेल व भाजपाच्या सहकार्याने छबुताई देवराव मेश्राम यांचा वर्णी लागली होती.
आगामी नगरपालिका निवडणुकीत राहणार 34 नगरसेवक आगामी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दरम्यान १७ प्रभागातून प्रत्येकी दोन नगरसेवक मतदार निवडणार आहेत. आज मंगळवार ला नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. प्रभाग क्रमांक १ मध्ये अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण असे आरक्षण आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये अनुसूचित जाती व ओबीसी महिला, प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनुसूचित जाती व ओबीसी महिला, प्रभाग क्रमांक ४ मध्ये ओबीसी महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ५ मध्ये ओबीसी व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ६ मध्ये ओबीसी महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ७ मध्ये अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण,प्रभाग क्रमांक ८ मध्ये अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ९ मध्ये ओबीसी व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १० मध्ये अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ११ मध्ये अनुसूचित जाती महिला व ओबीसी, प्रभाग क्रमांक १२ मध्ये अनुसूचित जाती व ओबीसी महिला, प्रभाग क्रमांक 13 मध्ये अनुसूचित जमाती व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १४ मध्ये अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक १५ मध्ये ओबीसी व सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक १६ मध्ये अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला, तर प्रभाग क्रमांक १७ मध्ये अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण असे नगरसेवकांचे आरक्षण आहे.


