तालुक्यातील 70 ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा व लाईव्ह प्रक्षेपण
भद्रावती : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग व जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती भद्रावतीच्या वतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ नंदोरी येथे उत्साहात पार पडला. या निमित्ताने तालुक्यातील 70 ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
. कार्यशाळेचे उद्घाटन व अध्यक्षस्थान गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. बंडु आकनुरवार, सरपंच मंगेश भोयर, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जिवतोडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आसुटकर, उपसरपंच उषा लांबट, किशोर उमरे, शरद खामणकर, भानुदास ढवस, जयश्री एकरे, विस्तार अधिकारी प्रकाश पारखी, प्रणाली भागवत, ग्राम महसूल अधिकारी रवींद्र लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.
. कार्यक्रमाची सुरुवात मुख्य मार्गावरील स्वच्छता मोहिम व स्वच्छतेची शपथ घेऊन झाली. त्यानंतर राष्ट्रसंत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वागतगीताने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
. गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ यांनी ग्रामपंचायतची कार्यक्षमता वाढविणे, सुशासन प्रशासन, मनरेगा योजना अभिसरण, ग्रामपातळीवरील संघटन सक्षमीकरण व उपजीविका विकास याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. आकनुरवार यांनी सामाजिक न्याय, लोकसहभाग व श्रमदानाचे महत्त्व अधोरेखित केले. सरपंच मंगेश भोयर यांनी ग्रामविकासासाठी लोकचळवळ उभारण्याचे आवाहन केले. तर नरेंद्र जिवतोडे यांनी स्वच्छता ही सेवा मोहिमेवर भाष्य केले. ग्राम महसूल अधिकारी रवींद्र लोंढे यांनी पांदण रस्ते विकासासंबंधी मुद्देसूद मार्गदर्शन केले.
. यावेळी आदिशक्ती समिती स्थापन करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच मंगेश भोयर यांनी केले. संचालन शिक्षक अमित गजभिये यांनी तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत अधिकारी विकास तेलमासरे यांनी केले.
. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विस्तार अधिकारी प्रकाश पारखी, एपीओ सूरज खोडे, राहुल घायवनकर, तसेच सरपंच व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


