चंद्रपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दि. १३ सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालयासह सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले.
![]()
. या लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा समृध्दी भीष्म यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
. लोकअदालतीत एकूण ९५३७ प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे व १५६६२ दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ८५५ प्रलंबित व २१२ दाखलपूर्व अशी एकूण १०६७ प्रकरणे यशस्वीरित्या निकाली काढण्यात आली.
. यामध्ये मोटार अपघात दाव्यांची २८ प्रकरणे निकाली काढून २ कोटी ५१ लक्ष ४५ हजार रुपये इतकी नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली. दाखलपूर्व प्रकरणांमधून १ कोटी २८ लक्ष ६१ हजार ६०७ इतकी रक्कम वसूल करण्यात आले. धनादेश अनादरित झालेल्या ६६ प्रकरणांचा निकाल लावण्यात आला, तर कामगार व औद्योगिक न्यायालयातील १ प्रकरण निकाली निघाले.
. या लोकअदालतीच्या यशस्वीतेसाठी सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहकार्य केले, अशी माहिती एस. एस. इंगळे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांनी दिली.


