वरोरा : लोकमान्य महाविद्यालय, वरोरा आणि गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्स (एबीसी आयडी) व संशोधनातील नैतिकता या विषयावर राज्यस्तरीय एक दिवसीय क्षमतावृद्धी कार्यशाळा दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली. ही कार्यशाळा पीएम-उषा योजनेंतर्गत सॉफ्ट कॉम्पोनंट्स योजनेखाली आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमांतून पार पडली.
. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी लोकशिक्षण संस्था वरोरा चे सचिव प्रा. विश्वनाथ जोशी हे उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी त्यांच्या काळातील आणि आजच्या शैक्षणिक प्रणालीतील फरक अधोरेखित केले. तसेच त्यांनी क्रेडिट प्रणालीतील बदलांचेही विवेचन विशद केले. त्याचबरोबर संशोधनाचे महत्त्व आणि संशोधनाचे बदलते स्वरूप यावरही आपले विचार मांडले.
. लोकमान्य महाविद्यालय वरोरा च्या प्रभारी प्राचार्य डॉ. जयश्री शास्त्री, यांनी स्वागतपर भाषण केले व कार्यशाळेच्या विषयाची ओळख ऑनलाइन व ऑफलाइन सहभागींस करून दिली.
. या कार्यशाळेस साधन व्यक्ती म्हणून आनंद निकेतन महाविद्यालयातील आयक्यूएसी समन्वयक, डॉ. निलेश उगेमुगे हे उपस्थित होते. त्यांनी संशोधनातील नैतिकता या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संशोधकाने नैतिकता बाळगूनच आपले संशोधन कार्य पूर्ण करावे,अन्यथा भविष्यामध्ये अशा संशोधकाला गंभीर बाबींना सामोरे जावे लागू शकते. या अनुषंगाने मत मांडले.
. या कार्यशाळेसाठी दुसरे संसाधन व्यक्ती म्हणून डॉ. श्रावण बानासुरे, आयक्यूएसी समन्वयक, कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, बल्लारपूर उपस्थित होते. त्यांनी एबीसी आयडीवर आपले विचार मांडले. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी एबीसी आयडीची संकल्पना, महत्त्व व त्याचे विद्यार्थ्यांना होणारे फायदे याचे सविस्तर विवेचन केले. त्यांनी क्रेडिट्सचा अर्थ स्पष्ट करून एबीसी आयडी तयार करण्याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिकेही दाखवली.
. या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १०५ विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित होते, तर १०० हून अधिक विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातून सहभागी झाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लोकमान्य महाविद्यालयाचे आयक्यूएसी समन्वयक डॉ. श्रीकांत पुरी यांनी केले. तर डॉ. रवींद्र शेंडे, विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने व सांगता राष्ट्रगीताने झाली.


