Home सामाजिक वातावरणातील बदलांमुळे “व्हायरल फिव्हर” चे थैमान

वातावरणातील बदलांमुळे “व्हायरल फिव्हर” चे थैमान

638

दवाखाने हाऊसफुल

नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आव्हान

सिंदेवाही : हवामानात होत असलेल्या सततच्या बदलांमुळे सर्दी, खोकला, डोकेदुखी, आणि “व्हायरल फिव्हर” यासारख्या आजारांनी पछाडले असून सिंदेवाही तालुक्यातील खाजगी व सरकारी दवाखान्यातील गर्दी दिवसेंदिवस हाऊसफुल होताना दिसत असल्याने नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

.       यावर्षी सिंदेवाही तालुक्यात पावसाने चांगलाच कहर केला असून दिवसा उकाडा, तर रात्री अचानक थंडी आणि पाऊस, अशा उलट सुलट वातावरणामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडत चालले आहे. गेल्या काही दिवसापासून एकाच घरातील अनेक सदस्यांना सर्दी, खोकला, आणि ताप येण्याचे प्रकार वाढले आहेत. आधीपासून आजारी असलेल्या व्यक्तींना याचा चांगलाच फटका बसला आहे. सिंदेवाही शहरातील खाजगी तथा ग्रामीण रुग्णालयासह ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची गर्दी वाढलेली आहे. तालुक्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात दररोज १५० चे वर बाह्यरुग्ण उपचार घेत आहेत. तसेच खाजगी दवाखाने सुद्धा हाऊसफुल होताना दिसत आहेत. वातावरणातील बदल हे याचे मुख्य कारण असल्याचे डॉक्टरांकडून बोलल्या जात आहे. सकाळी थोडीशी थंडी, दुपारी कडक उन्ह, संध्याकाळी दमटपणा, तर रात्री पाऊस . ही स्थिती आरोग्यास हानिकारक ठरत आहे. तसेच आरोग्य विभागाच्या माहिती नुसार डबक्यात पावसाचे साचलेले पाणी, नाल्यातील अस्वच्छता, पिण्याचे दूषित पाणी, यामुळे साथीचे आजार बळावणार असल्याचे डॉक्टर सांगत आहेत.

.        त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेचे महत्व समजून घेणे, प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे मोफत तपासणी व औषधोपचार करणे, पाणी पिण्यापूर्वी उकळून पिणे, पुरेसे पाणी पिणे, शरीराला विश्रांती देणे, गरम पाण्याचा वाफारा घेणे, फळे, भाज्यांचा आहार घेणे, गर्दीत जाण्याचे टाळावे, तोंडाला मास्क वापरावा, अशा प्रकारचे आरोग्य विभागाकडून सल्ले देण्यात आले आहेत. सध्याच्या स्थितीत डॉक्टरांचा सल्ला, योग्य काळजी, आणि स्वच्छतेच्या सवयी, यावरच आपले आरोग्य अवलंबून आहे. हवामान बदल आपल्याला टाळता येणार नाही. पण त्याचा परिणाम टाळणे आपल्या हातात आहे.

error: Content is protected !!