Home सामाजिक आंदोलन, उपोषण आणि संघर्षातून घडलेलं नेतृत्व म्हणजे किशोर डुकरे

आंदोलन, उपोषण आणि संघर्षातून घडलेलं नेतृत्व म्हणजे किशोर डुकरे

639

तरुणाईसाठी प्रेरणास्थान, शेतकऱ्यांसाठी आधारस्तंभ

ग्रामीण जीवनात संघर्ष, मेहनत आणि स्वाभिमान ही मूल्ये घेऊन पुढे आलेल्या एका तरुणाने आज संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा बुलंद आवाज बनण्याचे काम केले आहे. तो नेता म्हणजेच चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा तालुका येथील आसाळा गावचा किशोर डुकरे या शेतकऱ्यांच्या घामाची किंमत जाणून, त्यांच्या समस्या शासन-प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे धाडस दाखवणारा आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सदैव लढणारा युवा नेता किशोर डुकरे यांचा आज वाढदिवस.

.       शेतकरी कुटुंबात जन्मलेला किशोर यांनी लहानपणापासूनच शेतीचे कष्ट अनुभवले. शेतमालाला योग्य भाव न मिळणे, शेतीवरील वाढते खर्च आणि पिकविमा या गुंतागुंतीच्या प्रश्नांचा जवळून अभ्यास केला. हाच अनुभव त्यांच्या नेतृत्वाचे बळ ठरला. गावोगावी जाऊन शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याचे कार्य त्यांनी सुरू केले. हमीभाव, सिंचन, वीज आणि पिकविमा अशा मुद्द्यांवर त्यांनी नेहमी ठाम भूमिका घेतली. आंदोलन असो वा शासनासमोर ठोस मांडणी त्यांचा आवाज नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठीच दुमदुमला.

.     किशोर डुकरे यांच्या नेतृत्वातील संघर्षमय प्रवास अनेकांना प्रेरणादायी आहे. शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा यासाठी त्यांनी वरोरा तहसील कार्यालयासमोर तब्बल ८ दिवस आमरण उपोषण करून अखेर विमा कंपनीला झुकवले. इतकेच नव्हे तर चंद्रपूर-नागपूर महामार्गावर वरोरा, खांबाडा, टेमुर्डा येथे चक्का जाम आंदोलन, भीक मांगो आंदोलन, लोटांगण आंदोलन, तर चक्क तलावात उतरून आंदोलन करुन शासनाला दणका दिला. या लढ्यात त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले तरीही ते कधीच मागे हटले नाहीत.

.       शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या या तरुणाने सामाजिक क्षेत्रातही वेगळा ठसा उमटवला आहे. वर्धा येथील सामाजिक कार्यकर्त्यांना घेऊन वरोरा शहरा सोबतच तालुक्यातील मनोरुग्णाला मानवी सन्मान मिळावा यासाठी त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांसह त्याची अंघोळ घालून, दाढी-कटिंग करून, नवीन कपडे घालून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या उपक्रमामुळे त्यांना शेतकऱ्यांचा नेता तर बनवलंच, पण मनोरुग्णांचा देवदूत अशीही ओळख मिळाली.

.       आज जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता किशोर डुकरे यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात आदराने घेतले जाते. त्यांची कार्यपद्धती युवकांना प्रेरणा देते, तर शेतकरी बांधवांचा विश्वास जिंकून ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रतिनिधी बनले आहेत.

.       त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेतकरी, कार्यकर्ते आणि नागरिक त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत आहेत. संघर्षमय प्रवासातही आशा न सोडता, धैर्याने पुढे जाणाऱ्या या लढवय्या नेत्याला दीर्घायुष्य लाभो आणि शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढ्यात त्यांची भूमिका सतत अग्रगण्य राहो हीच अपेक्षा.

नवामार्ग न्युज पोर्टल परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

वृत्तलेखन

     करण ठाकरे,
उपसंपादक, नवामार्ग न्युज पोर्टल 

error: Content is protected !!