तहसिलदार रेणुका कोकाटे बांधावर
शेतकऱ्यांनी रस्ता अडवू नये म्हणून दिले निर्देश
बल्लारपूर : तालुक्यात खरिप हंगाम सुरु झाला आहे. अशातच शेतकऱ्यांमध्ये ये – जा करण्याच्या रस्त्यावरून अडवणुकीचे धोरण अवलंबले जात आहे. बल्लारपूर तालुक्यात मानोरा येथील शेतकऱ्यांचा वाद तहसील कार्यालयात पोहचला.अखेर तहसिलदार रेणुका कोकाटे यांनी वादाची तातडीने दखल घेतली. गुरुवार (दि. १७) रोजी स्वतः पथकासह शेत बांधावर गेल्या.आपसी सहमतीने वाद असणाऱ्या शेतकऱ्यांना समज दिली. एकमेकांचा शेत वहिवाट असलेल्या रस्त्यावर अडवणूक करू नये, म्हणून निर्देश दिले. यामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
. बल्लारपूर तालुक्यात सर्वत्र खरिप हंगाम सुरु झाला आहे. यातून शेत वहिवाट मार्ग अडवून काही शेतकरी अडचण निर्माण करत आहेत. या अनुषंगाने तहसील प्रशासनाकडे दाद मागितली जात आहे. आपसातील वाद वेळप्रसंगी जिवावर उठण्याच्या घटना घडतात. या घटनेचे गांभीर्य जाणून बल्लारपूर येथील तहसिलदार रेणुका कोकाटे, नायब तहसिलदार महेंद्र फुलझले, ग्राम महसूल अधिकारी प्रकाश कंबलवार यांनी मानोरा येथील शेत शिवारात प्रत्यक्ष मौका चौकशी करण्यासाठी शेत बांधावर गेले.पिडीत शेतकऱ्यांची व रस्ता अडवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांची समजूत काढली. सरकारी नाल्यालगत वहिवाट असणारा रस्ता कोणीही अडवू नये, म्हणून निर्देश दिले.
. यावेळी मानोरा येथील शेतकरी तेजराव पिपरे, बाळकृष्ण पिपरे, मनोज बुरांडे, फरीददास पिपरे, नंदकिशोर शेट्टे, विलास पिपरे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या समक्ष शेतीच्या वहिवाट असणाऱ्या रस्ताच्या वादावर तोडगा काढला. यावेळी तहसिलदार रेणुका कोकाटे यांनी कायमस्वरुपी वहिवाट रस्ता करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी शेत जमीन मोजणी करण्याचे निर्देश शेतकऱ्यांना दिले. यासाठी शेतकऱ्यांना शासन सहकार्य करणार म्हणून अवगत केले. शेत वहिवाट रस्ता प्रश्न निकाली निघाल्याने शेतकऱ्यांना ऐन खरिप हंगामात मोठा दिलासा मिळाला आहे.


